अमरावती - पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या स्वच्छतेची नेरपिंगळाई ग्रामस्थांची मागणी
अमरावती, 31 मे (हिं.स.) | पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना गावातील नाल्या, गटारी आणि पाणी वाहून जाणारे मार्ग अद्यापही गाळ, कचरा व झाडाझुडुपांनी भरलेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी ग्र
पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करा नेरपिंगळाई येथील ग्रामस्थांची मागणी, प्लॅस्टिक अडकल्याने अडचण


अमरावती, 31 मे (हिं.स.) | पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना गावातील नाल्या, गटारी आणि पाणी वाहून जाणारे मार्ग अद्यापही गाळ, कचरा व झाडाझुडुपांनी भरलेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात गावातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती नेरपिंगळाई ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत वसाहती तसेच काही सार्वजनिक ठिकाणांजवळील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक दिवसांपासून साफसफाई न झाल्याने नाल्यांमध्ये प्लॅस्टिक, कचरा, माती व गवत साचलेले दिसून येत आहे. जोरदार पाऊस झाल्यास हेच पाणी रस्त्यावर येऊन साचण्याची शक्यता असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकी वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. ग्रामस्थांच्या मते, नाल्यांमध्ये गाळ साचल्यामुळे पाणी वाहून जाण्याचा वेग कमी होतो.

परिणामी काही भागात सांडपाणी आणि पावसाचे पाणी एकत्र साचून दुर्गंधी निर्माण होते. अशा अस्वच्छ वातावरणामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, ताप यासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वेळेत उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतरच प्रशासनाकडून साफसफाईची कामे हाती घेतली जातात. मात्र त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर उपाययोजना केल्या जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यावर्षी पावसाळ्यापूर्वीच ग्रामपंचायतने विशेष मोहीम राबवून सर्व नाल्यांची साफसफाई करावी, गाळ काढावा तसेच पाणी अडवणारे अतिक्रमण आणि कचरा हटवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावातील बहुतांश नाल्या बंदिस्त झालेल्या आहेत. काही नाल्यांची कामे सुरू आहे. उर्वरित नाल्यांच्या साफसफाईची कामे दहा दिवसांत पूर्ण करण्यात येतील. -विनोद मनवर, ग्रामविकास अधिकारी.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande