
मुंबई, 31 मे (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीने १७ जागांचा तिढा सोडवला आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. जवळपास अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तसेच १४ जागांवर वर्चस्व असतानाही युती धर्म पाळत भाजपने ११ जागा लढवण्यावर तयारी दर्शवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी