कोनार्क मालकावर स्थायी समितीत नगरसेवकांचा हल्लाबोल; संतप्त कंपनीचे मालक बैठक अर्ध्यात सोडून निघून गेले
अमरावती, 07 मे (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवरून पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ उडाला असून, कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकाला स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. गेल्या अनेक महिन्यांपासून
कोनार्क मालकावर स्थायी समितीत नगरसेवकांचा हल्लाबोल; संतप्त जेठानी बैठक अर्ध्यात सोडून निघून गेले


अमरावती, 07 मे (हिं.स.)

अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवरून पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ उडाला असून, कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकाला स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील ढासळलेल्या स्वच्छता व्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त असताना, अखेर महानगरपालिका प्रशासनाने कंपनीच्या प्रमुखांनाच जाब विचारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या बैठकीतही कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने वातावरण अधिकच तापले.स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश मार्डीकर यांनी मुंबईस्थित कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक नंदुसेठ जेठानी यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी समितीची विशेष बैठक पार पडली. बैठकीला स्थायी समितीचे १६ सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बाहेरील कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता.बैठक सुरू होताच नगरसेवकांनी कोनार्क कंपनीच्या कामकाजावर तुफान संताप व्यक्त केला. शहरातील अस्वच्छ रस्ते, वेळेवर न होणारी कचरा उचल, नाल्यांची दुरवस्था, नागरिकांच्या तक्रारी आणि वाढती नाराजी यावरून सदस्यांनी जेठानी यांना धारेवर धरले. अनेक नगरसेवकांनी “शहराला कचराकुंडी बनवले”, “नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका” अशा शब्दांत संताप व्यक्त केल्याचे समजते.वाद वाढत असताना वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. तब्बल अनेक तास चाललेल्या या चर्चेदरम्यान नगरसेवकांकडून सातत्याने होत असलेल्या सवालांच्या भडिमारामुळे नंदुसेठ जेठानी संतप्त झाले आणि कोणतेही स्पष्ट उत्तर न देता अचानक बैठक अर्ध्यातच सोडून निघून गेले. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित सदस्यांचा संताप आणखी वाढला.जेठानी बैठकीतून निघून गेल्यानंतर सर्व सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश मार्डीकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. “कोनार्क कंपनीच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांसह नगरसेवकही त्रस्त झाले आहेत. मालक बैठकीत येणार म्हणून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र उत्तरांऐवजी त्यांनी पलायन केले,” अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.दरम्यान, या घटनेनंतर कोनार्क कंपनीविरोधात अधिक कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली असून, महानगरपालिकेची पुढील भूमिका काय असणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande