बीड भूसंपादन घोटाळा: माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक
बीड, 07 मे (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करत एसआयटीने तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. लातूरमधून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक न
अविनाश पाठक, बीड के तत्कालिन डीएम


बीड, 07 मे (हिं.स.) :

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करत एसआयटीने तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. लातूरमधून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.

या प्रकरणात पाठक यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली होती. एसआयटीमार्फत सुरू असलेल्या तपासात आतापर्यंत 10 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घोटाळ्यात राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनींच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांचा मावेजा वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून आदेश तयार करण्यात आले, असा तपासात निष्कर्ष आहे. या माध्यमातून सरकारची सुमारे 73 कोटी रुपयांहून अधिक रक्कम फसवली गेल्याचे समोर आले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 154 प्रकरणांमध्ये जुन्या तारखांचे बनावट आदेश तयार करून तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. यापैकी सुमारे 73 कोटी 4 लाख रुपयांचे वाटपही संबंधित खातेदारांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या आदेशांशी संबंधित कोणतेही अधिकृत रजिस्टर किंवा नोंदी भूसंपादन समन्वय कार्यालयात उपलब्ध नसल्याचेही तपासात समोर आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास एम. व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande