राज्यातील अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित
* थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित कुटुंबांना तातडीच्या मदतीची मागणी मुंबई, 07 मे (हिं.स.) - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यात अल्पवयीन मुली आणि मुलांवरील वाढत्या लैंगिक
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


* थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित कुटुंबांना तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई, 07 मे (हिं.स.) - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यात अल्पवयीन मुली आणि मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना पत्र पाठवून कठोर आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितांना जलद न्याय देण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळचे नातेवाईक आणि शेजारीच आरोपी असल्याने समाजात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. थेऊर येथे ६ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचाराचा प्रयत्न, लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, अकोल्यात १० वर्षीय चिमुकलीवर वृद्ध शेजाऱ्याकडून अत्याचार, कोल्हापुरात जन्मदाते वडील व नातेवाईकांकडून १५ वर्षीय मुलीवर पाच वर्षे सुरू असलेले अत्याचार तसेच सोलापुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण करून तातडीने चार्जशीट दाखल करावी, आरोपींना जामीन मिळू नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी आणि सर्व खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना POCSO कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

तसेच प्रत्येक पीडित बालकाच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ ते १० लाखांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबांना सुरक्षित निवास, आर्थिक उपजीविकेच्या संधी, साक्षीदार संरक्षण आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या अत्यंत संवेदनशील प्रकरणांकडे वैयक्तिक लक्ष देऊन पीडित कुटुंबियांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande