
लातूर, 07 मे (हिं.स.) : जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र बी. प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 2026 (एमबीए, पीसीबी व पीसीएम) ही परीक्षा एमबीए ग्रुपकरिता 9 मे, 2026 रोजी ऑनलाईन पध्दतीने लातूर जिल्ह्यातील 2 परीक्षा केंद्रावर, तसेच पीसीएम ग्रुपकरिता 12 ते 20 मे, 2026 ( दि. 16,17 व 18 मे , 2026 वगळून) या कालावधीत लातूर जिल्ह्यातील एकूण 14 परीक्षा केंद्रावर दोन सत्रामध्ये आयोजित केलेली आहे. या परीक्षा कालावधीमध्ये परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहूल कुमार मीना यांनी लागू केले आहेत.
त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी व्यतिरिक्त पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. हे आदेश 9 ते 20 मे, 2026 (दि. 16,17 व 18 मे, 2026 वगळून) या कालावधीत सकाळी 7 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis