
ठाणे, 07 मे (हिं.स.)। शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अमृत महोत्सवी जन्मत्सोवानिमित्त कल्याणमध्ये ``जनमत'' संस्थेच्या पुढाकाराने `आठवणींतले बाळासाहेब व आनंद दिघे' हा कार्यक्रम रविवार दिनांक १० मे रोजी सकाळी रंगणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु असून त्यानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कल्याण शहराचे एक वेगळे नाते आहे. शिवसेनाप्रमुख अनेक वर्षे कल्याण शहरात वास्तव्यास होते. जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार व समाजकार्यकर्ते एकत्र येणार आहेत.
रविवार दि. १० मे रोजी सकाळी ११ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार्या या आगळ्यावेगळ्या स्मृतीसमारोहास कल्याण डोंबिवलीच्या महापौर अॅड. हर्षाली चौधरी, ज्येष्ठ पत्रकार, अनेक दैनिकांचे माजी संपादक, स्तंभलेखक, डॉ. सुकृत खांडेकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष कुमार कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, हिंदू मंचचे दिनेश देशमुख, जनता सहकारी बँकेचे डॉ. चंद्रशेखर तांबडे व ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे शिवसेनाप्रमुख व आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.
`आठवणींतील बाळासाहेब' या कार्यक्रमानिमित्ताने दैनिक जनमतच्या ३५व्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. जनमत या सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचे तेजस राजे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यव्रâमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनमत संस्थेने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर