
ठाणे, 07 मे, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या संघटना कार्यविस्तारासाठी पक्षाच्या ठाणे-कोकण विभागीय सहसंयोजकपदी ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच ही निवड केली.
भाजपने विभागस्तरावर समन्वयासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार ठाणे व कोकणातील पक्ष समन्वय आणि सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर असेल. ठाणे-कोकणच्या समन्वयकपदी आमदार योगेश सागर, संयोजक आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर सहसंयोजक म्हणून संजय वाघुले यांची नियुक्ती करण्यात आली.
ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून संजय वाघुले यांची सलग पाचव्या वेळी निवड झाली. त्यांनी भाजपच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदासह स्थायी समिती अध्यक्षपद, गटनेतापद भूषविले आहे. पक्षाच्या संघटनेबरोबरच ते विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रम राबवित आहेत. गेल्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाही पार पडली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर