
पुणे, 07 मे (हिं.स.)राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून, त्या सर्व ठिकाणी कर्मचारी राज्य विमा निगमाची (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.
पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालय येथे नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह रमेश कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्त रमेश चव्हाण, इतर वरीष्ठ इतर अधिकारी, तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कामगार कायद्यांतर्गत प्रस्तावित केल्यानुसार, 40 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील कामगारांसाठीचा हा देशव्यापी वार्षिक आरोग्य तपासणी उपक्रमाचा शुभारंभ आज कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, बसैदारापूर, नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आला. याच वेळी देशातील इतर 11 ईएसआयसी रुग्णालयांमध्येही हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील ईएसआयसी रुग्णालयाचाही समावेश आहे.
पुण्यात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कामगार मंत्री आकाश फुंडकर आपल्या भाषणामध्ये म्हणाले की, कामगारांना कोणताही आजार उद्भवण्यापूर्वीच त्यांची आरोग्य तपासणी करणे हा सरकारचा मानस आहे. नियमित तपासणीमुळे गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन कामगारांना मोठ्या आरोग्य धोक्यांपासून वाचवता येईल. सध्या राज्यात औद्योगिकीकरण वाढत असून कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा स्थितीत ईएसआयसी रुग्णालयांची गरज भासणार असून केंद्र सरकारसोबत यासंदर्भात सल्लामसलत करून रुग्णालयांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी औद्योगिक अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या कामगारांना तत्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांची मदत घेण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज व्यक्त केली. अनेक खासगी रुग्णालये आणि डॉक्टर ही सेवा मोफत देण्यास तयार आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे