
मुंबई, 08 मे (हिं.स.)। वनप्लसने भारतात आपल्या लोकप्रिय नॉर्ड सीरिजमधील दोन नवीन स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई६ आणि नॉर्ड सीई६ लाइट लॉंच केले आहेत. दमदार बॅटरी, उच्च दर्जाचा डिस्प्ले आणि मजबूत परफॉर्मन्स यामुळे हे दोन्ही स्मार्टफोन मिड-रेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे नॉर्ड सीई६ मध्ये तब्बल ८०००mAh बॅटरी देण्यात आली असून, दीर्घकाळ फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा मोठा आकर्षण ठरणार आहे.
वनप्लस नॉर्ड सीई६ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंट ३२,९९९ रुपयांना मिळणार आहे. बँक ऑफर्सनंतर या किंमती आणखी कमी होणार आहेत. या फोनची विक्री ८ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
नॉर्ड सीई६ मध्ये ६.७८ इंचाचा १.५के सनबर्स्ट अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. १४४Hz रिफ्रेश रेट, ३६०० निट्स पीक ब्राइटनेस आणि १०-बिट कलर सपोर्टमुळे व्हिडीओ पाहताना आणि गेमिंग करताना उत्कृष्ट अनुभव मिळतो. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर देण्यात आला असून मोठ्या व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टममुळे फोन गरम होण्याची समस्या कमी होते. OxygenOS 16 आधारित Android 16 वर हा फोन चालतो.
या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची ८०००mAh बॅटरी. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केल्यानंतर हा फोन सुमारे अडीच दिवस सहज चालू शकतो. यामध्ये ८०W सुपरव्हूक फास्ट चार्जिंग, २७W रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंगसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. कॅमेऱ्याबाबत बोलायचं झाल्यास, यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. दोन्ही बाजूंनी ४के व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते.
दुसरीकडे, वनप्लस नॉर्ड सीई६ लाइट हा बजेट सेगमेंटमधील ग्राहकांना लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये ७०००mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 7400Apex प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.७२ इंचाचा १४४Hz डिस्प्ले असून स्मूथ स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव मिळतो. हा स्मार्टफोन Hyper Black आणि Vivid Mint अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नॉर्ड सीई६ लाइट मध्ये ५० मेगापिक्सलचा OIS सपोर्ट असलेला मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ४के व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्टही यात मिळतो. हा फोन Android 16 आधारित OxygenOS 16 वर चालतो आणि कंपनीने ५ वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देण्याचं आश्वासन दिलं आहे.
नॉर्ड सीई६ लाइट तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट २२,९९९ रुपयांना तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंट २५,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मोठी बॅटरी, दमदार परफॉर्मन्स, आकर्षक डिस्प्ले आणि मजबूत बिल्ड क्वालिटीमुळे हे दोन्ही स्मार्टफोन गेमिंग, मल्टिमिडीया आणि दैनंदिन वापरासाठी उत्तम पर्याय मानले जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule