
वॉशिंग्टन, 12 जून (हिं.स.)। युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी तसेच रशिया-अमेरिका संबंध सामान्य करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एखादा प्रस्ताव येऊ शकतो, अशी अपेक्षा रशियाने व्यक्त केली आहे. रशियाने म्हटले आहे की, अशा कोणत्याही प्रस्तावाचा रशियन नेतृत्व सकारात्मक पद्धतीने विचार करेल.
अमेरिकेतील रशियाचे राजदूत अलेक्झांडर डार्चिएव यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या प्रशासनाच्या काळात रशिया-अमेरिका संबंधांमध्ये सुधारणा झाली असून नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांनी म्हटले की, सध्याच्या अमेरिकी प्रशासनाच्या कार्यकाळात रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध काही प्रमाणात अधिक चांगले झाले आहेत.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना डार्चिएव म्हणाले की, संबंध सामान्य करण्यासाठी आणि युरोपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रस्तावाची रशियन सरकार अमेरिकेकडून प्रतीक्षा करत आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रस्तावावर रशियन सरकार तातडीने आणि सकारात्मक पद्धतीने विचार करेल.
पत्रकारांशी बोलताना डार्चिएव म्हणाले, आम्ही अमेरिकेच्या बाजूकडून निर्णयाची वाट पाहत आहोत. कोणत्याही पर्यायावर तात्काळ विचार केला जाईल.
ते पुढे म्हणाले की, उशिरा का होईना, एखादा अमेरिकेचा राजनैतिक अधिकारी निश्चितच मॉस्कोला भेट देईल, अशी रशियाला अपेक्षा आहे. मात्र, हा पुढाकार अमेरिकेच्या बाजूकडूनच घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रिया नोवोस्तीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राजदूतांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उर्वरित कार्यकाळात रशिया-अमेरिका संबंधांमध्ये मोठे यश मिळू शकते. डार्चिएव म्हणाले, काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. माझ्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे असे व्यक्तिमत्त्व आणि राजकारणी आहेत, जे जगाला आश्चर्यचकित करू शकतात आणि मोठे यश मिळविण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule