मोदींच्या कार्यशैलीतून आकाराला आलेला महिला सहभाग
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी महिलांच्या सन्मानार्थ ज्या योजना सुरू केल्या त्या उल्लेखनीय आहेतच. तथापि, मोदींची महिला सन्मानाची कार्यशैली ही केवळ सरकारी योजनांपुरतीच मर्यादित नसून, ती महिलांना प्रत्ये
Womens participation Modi government


देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी महिलांच्या सन्मानार्थ ज्या योजना सुरू केल्या त्या उल्लेखनीय आहेतच. तथापि, मोदींची महिला सन्मानाची कार्यशैली ही केवळ सरकारी योजनांपुरतीच मर्यादित नसून, ती महिलांना प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आणून 'नेतृत्व' स्वीकारण्यास प्रवृत्त करणारी एक निरंतर धडपड आहे.

२०१४ पूर्वी भारतातील महिलांची स्थिती अत्यंत आव्हानात्मक आणि विदारक होती. ग्रामीण भागात कोट्यावधी महिला मूलभूत सुविधांपासून वंचित होत्या. घराघरात स्वच्छ शौचालयांचा अभाव असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होता. चुलीच्या धुरामुळे श्वसनाचे विकार जडत होते. आर्थिक व्यवहारांत महिलांचा सहभाग नगण्य होता कारण स्वतःचे हक्काचे बँक खातेसुद्धा नव्हते. शिक्षणाच्या क्षेत्रातही मुलींच्या गळतीचे प्रमाण मोठे होते आणि संरक्षण दलासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत त्यांच्यासाठी 'लढाऊ' भूमिकांची द्वारे बंद होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या स्थितीत आमूलाग्र बदल झाला. 'स्वच्छ भारत' अभियानातून बांधलेली दहा कोटींहून अधिक शौचालये (इज्जत घर) आणि 'उज्वला' योजनेतून मिळालेले गॅस कनेक्शन यामुळे महिलांचे जीवन अधिक सुखावह झाले.

'जनधन' खात्यांमुळे महिला आर्थिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू बनल्या. आज 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'मुळे लिंग गुणोत्तरात सुधारणा झाली असून, महिला आता केवळ लाभार्थी न राहता 'ड्रोन दीदी' आणि 'लढाऊ विमान चालक' म्हणून भरारी घेत आहेत. 'नारी शक्ती वंदन' अधिनियमाद्वारे मिळालेले ३३ % आरक्षण हे महिलांवरील विश्वासाचे सर्वात मोठे प्रतीक असून, यामुळे भारतीय राजकारणात महिलांचा आवाज आता अधिक बुलंद झाला आहे.

नरेंद्र मोदींनी हे ओळखले आहे की, कुटुंबाचा पाया स्त्री असते; जर प्रत्येक कुटुंब सक्षम करायचे असेल आणि पर्यायाने देश सक्षम करायचा असेल, तर महिला सक्षम व्हायला हवी. या विचारातूनच त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न सोडवले आणि महिलांना 'विकास प्रक्रियेचे नेतृत्व' दिले. आज भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड असो किंवा सैन्यदल आणि नौदलाच्या महत्त्वाच्या पदांवर महिलांची वाढती उपस्थिती, हे सर्व मोदी सरकारची महिलांप्रती असलेली दूरदृष्टी आणि विश्वासाचेच प्रतीक आहे.

मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या लेकींनी आकाशाला गवसणी घातली आहे. 'खेलो इंडिया' आणि ऑलिम्पिकमधील खेळाडूंना मिळणारे थेट प्रोत्साहन यामुळे ग्रामीण भागातील मुली आज जागतिक स्तरावर पदके जिंकत आहेत. ज्याप्रमाणे पंतप्रधान स्वतः खेळाडूंना फोन करून त्यांचे मनोधैर्य वाढवतात, तेव्हा त्यातून एक पालकत्वाचा आणि विश्वासाचा धागा निर्माण होतो. भारतीय वायुसेनेतही महिलांना लढाऊ विमान (Fighter Pilot) चालवण्याची संधी मिळाली.

भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, मग ती गल्ली असो वा दिल्ली, महिलांचे नेतृत्व उदयाला येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या क्षमतांवर जो विश्वास टाकला, त्याला महिलांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने सार्थ ठरवले आहे. देशाच्या अमृतकाळात भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी महिलांचे हे सक्षम नेतृत्वच सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल. जेव्हा महिला सक्षम होते, तेव्हा केवळ एक कुटुंबच नाही, तर संपूर्ण राष्ट्र सामर्थ्यशाली होते, हेच मोदींच्या कार्यशैलीचे सार आहे.

भारताच्या विकास प्रवासात महिला आता केवळ लाभार्थी राहिलेल्या नसून त्या 'विकास प्रक्रियेच्या खऱ्या चालक' बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वोच्च पदांवर महिलांची नियुक्ती होऊन एक नवा इतिहास रचला गेला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने भारताला पहिल्या जनजाती महिला राष्ट्रपती मिळाल्या, ज्यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची प्रतिष्ठा वाढवत वंचितांना मुख्य प्रवाहात आणले. आर्थिक आघाडीवर निर्मला सीतारामन यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेचे अत्यंत कुशलतेने सारथ्य केले आहे.

राजकारणच नव्हे, तर विज्ञान आणि प्रशासकीय क्षेत्रातही महिलांना मोठे व्यासपीठ मिळाले. डॉ. एन. कलाईसेल्वी या 'CSIR' च्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून ३८ वैज्ञानिक संशोधन संस्थांचे नेतृत्व करत आहेत, तर जया वर्मा सिन्हा यांनी रेल्वे बोर्डाच्या ११७ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्षा आणि CEO म्हणून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही फक्त पदे नसून, 'स्त्रीशक्ती'वर दाखवलेला तो विश्वास आहे, ज्यातून आजचा भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होत आहे. बिहारमधील महिला मतदारांनी तर पुरुषांपेक्षा जास्त संख्येने मतदान करून भाजप आणि एनडीएवर जो विश्वास दाखवला, तो केंद्र सरकारच्या 'अंत्योदय' (शेवटच्या माणसाचा विकास) या मूळ विचारधारेला दिलेली पसंती आहे.या निवडणुकीत महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त संख्येने केलेले मतदान हे सिद्ध करते की, जेव्हा एखादे सरकार अंत्योदयाच्या भावनेतून स्त्रीच्या सन्मानासाठी झटते, तेव्हा ती 'शक्ती' उघडपणे समर्थनासाठी उभी राहते.

गेल्या दशकात भारताने केवळ योजनांचा विस्तार पाहिला नाही, तर एका व्यापक 'वैचारिक परिवर्तनाचा' अनुभव घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांकडे केवळ 'मतदार' किंवा 'लाभार्थी' म्हणून न पाहता, त्यांना 'राष्ट्रनिर्मात्या' म्हणून मुख्य प्रवाहात आणले. यामुळे महिलांच्या मनात जो आत्मविश्वासाची ज्योत पेटली आहे, ती आता विझणार नाही. हा प्रवास असाच सुरू राहणार आणि येणाऱ्या 'विकसित भारताचे' नेतृत्व देशातील महिलाच करती. हा आत्मविश्वास हीच या 'निर्णायक क्रांतीची' खरी ताकद आहे.

- प्रतीक्षा लोकरे

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande