
तेहरान, 14 जून (हिं.स.)अमेरिकेसोबतच्या शांतता कराराच्या निषेधार्थ इराणमधील एक गट रस्त्यावर उतरला आहे. या कराराविरोधात इराणच्या अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत. आंदोलकांचा आरोप आहे की, हा करार इराणच्या हिताच्या विरोधात वाटाघाटी करून केला जात आहे, जे होता कामा नये. आंदोलकांनी विशेषतः परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी गालिबाफ आणि अमेरिकेसोबतच्या करारातील इराणचे मुख्य वाटाघाटीकार असलेल्या अराघची यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
तेहरानच्या इब्न सिना चौकात एक रॅली काढण्यात आली. अब्बास अराघची यांच्या विरोधात निषेध करण्यासाठी मशहदमधील परराष्ट्र मंत्रालयासमोरही डझनभर लोक जमले होते. फार्स न्यूज एजन्सीने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये मशहदमधील आंदोलक अराघची यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आंदोलकांचा विश्वास आहे की यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणचा प्रभाव कमकुवत होईल.
मशहदमध्ये महिला झेंडे फडकावताना आणि अप्रामाणिक घुसखोर अराघची मुर्दाबाद! अशा घोषणा देताना दिसल्या. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, आंदोलक म्हणत आहेत की अराघचीचा करार इराणसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनी अमेरिकेला अवाजवी आणि अनावश्यक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे, गालिबाफ आणि अराघची यांनी राजीनामा द्यावा.
आंदोलकांचा असा युक्तिवाद आहे की, हा करार इराणच्या हितांचे रक्षण करणार नाही आणि त्यामुळे देश होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण गमावेल. शुक्रवारी एका मुलाखतीत, अराघची यांनी सांगितले की, प्रस्तावित करारानुसार इराणी बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवली जाईल. या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा दावाही करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे