
पुणे, 15 जून (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध वारसा, दर्जेदार कथानके आणि आशयघन चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे १७, १८ आणि १९ जून २०२६ या कालावधीत ‘रुपेरी चित्रगाथा मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.मराठी चित्रपट असोसिएशन, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या ‘सामना’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
यंदा ‘सामना’ या अजरामर चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.मल्टिप्लेक्समधील वाढत्या तिकीटदरांमुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहणे अनेकदा परवडत नाही. परिणामी अनेक दर्जेदार चित्रपटांपासून प्रेक्षक वंचित राहत आहेत.यावर पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन सुरू करण्याच्या अभिनव संकल्पनेतून या महोत्सवाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी चित्रपट अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे, तसेच मराठी चित्रपट संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु