
मुंबई, 25 जून (हिं.स.) - मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते... महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत... खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे... पुण्यात विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी जातो... एका जिवंत महिलेला मृत घोषित करून तिच्या वडील आणि भावाला अटक करून मारहाण केली जाते... सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची ओळख ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे राज्य म्हणून निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला हे आता वास्तव बनत आहे, अशी टीका काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून केली.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपासून ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. भरदिवसा हत्या होतात, टोळ्या खुलेआम दहशत माजवतात, ड्रग्ज माफिया राज्यभर जाळं पसरवतात आणि सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत.
ज्या महाराष्ट्राने देशाला प्रगतीचा मार्ग दाखवला, त्या महाराष्ट्रात आज नागरिक स्वतःच्या सुरक्षेबाबत साशंक आहेत. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची घसरण नाही, तर राज्यकर्त्यांचे अपयश आहे.
सत्तेसाठी आमदार फोडा, खासदार फोडा, पक्ष फोडा, विरोधकांना संपवा... पण राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मात्र सरकारकडे ना इच्छाशक्ती आहे, ना धोरण, ना जबाबदारीची जाणीव, असेही म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी