अमरावती येथील अभ्यासिका प्रकरणातील अनियमित्तेबाबत दोषींवर कारवाई करणार - मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई, 25 जून, (हिं.स.)। अमरावती शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिका प्रकरणातील अनियमिततेबाबात संबधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुख आणि गृहप्रमुख (आहरण व संवितरण) यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौक
अमरावती येथील अभ्यासिका प्रकरणातील अनियमित्तेबाबत दोषींवर कारवाई करणार - मंत्री डॉ. अशोक वुईके


मुंबई, 25 जून, (हिं.स.)। अमरावती शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिका प्रकरणातील अनियमिततेबाबात संबधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुख आणि गृहप्रमुख (आहरण व संवितरण) यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून चौकशीत दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधानसभेत सांगितले.

अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत अभ्यासिका भाड्याने घेण्याच्या करारात झालेल्या अनियमितेतेबाबत सदस्य सुलभा खोडके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत, हरिष पिंपळे, नाना पटोले यांनी उपप्रश्न विचारात चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, अमरावती शहरात आदिवासी विकास विभागाची अभ्यासिका नसल्याने परीक्षेच्या काळात अभ्यासिकेची तातडीची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरूपात भाड्याची इमारत घेऊन अभ्यासिका सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत प्रथमदर्शनी काही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना भाडे अदा करण्यात आलेले नाही; तसेच हा करार रद्द करण्यात आला आहे.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande