युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री
सारथी ही सामाजिक परिवर्तन, युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे, 26 जून (हिं.स.)। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञान
Jf


सारथी ही सामाजिक परिवर्तन, युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे, 26 जून (हिं.स.)। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून, या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारो घेण्यात येणाऱ्या परिक्षेत १४०, महाराष्ट्र लोकसेवा आयोग १ हजार १२४ आणि बँकिंग क्षेत्रात ५०० हून अधिक तरुण-तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणांतून १३ हजारांहून अधिक युवक रोजगारक्षम झाले असून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे.मराठा समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तीन पैलूंवर आधारित धोरण राबविण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या शहरात होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी वासतिगृह आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयापर्यंत आर्थिक सहकार्य करण्यास सुरुवात झाली. उद्योजकता विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गतिमान करण्यात आले आणि व्याज सवलत सुरू करण्यात आली. या माध्यमातून पाऊणे दोन लाखापेक्षा अधिक उद्योजक तयार झाले असून साडेसात हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी शासन वर्षाला १५०० कोटी देते , असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, पीएचडी, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य विकसित करण्यासाठी सारथीने प्रभावी काम केले आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे, तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, गुणवत्ता आणि कठोर परिश्रमाच्या बळावर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सारथीची भक्कम साथ आहे.

शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत सारथीने उल्लेखनीय कामगिरी असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. सारथीच्या प्रशासकीय मुख्यालयासह आठ विभागीय कार्यालये आणि प्रत्येकी ५०० विद्यार्थी व ५०० विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह उभारणीसाठी १ हजार ३६० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी संधीची नवी दालने खुली झाली.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सारथीने आजपर्यंत युपीएससीमध्ये १४० तर एमपीएससीमध्ये १ हजार २४५ अधिकारी घडविले असून विविध शासकीय सेवांमध्ये हजारो युवक-युवती कार्यरत आहेत. ही केवळ आकडेवारी नसून समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण भागातील युवक डिजिटल कौशल्याशी जोडले गेले आहेत. विविध शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे पवार यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande