रायगडच्या समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी १५० सीसीटीव्ही
रायगड, 26 जून (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, बंदरे, जेट्टी आणि पोर्ट परिसरातील पर्यटक तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले अस
'Third eye' on Raigad's beaches; 150 CCTVs operational for tourist safety.


रायगड, 26 जून (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, बंदरे, जेट्टी आणि पोर्ट परिसरातील पर्यटक तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून संशयास्पद हालचालींवर २४ तास नजर ठेवली जात आहे.

पर्यटन आणि औद्योगिकीकरणामुळे वाढणारी गर्दी लक्षात घेता रायगड पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक प्रकल्पांमुळे राज्यातील तसेच परराज्यातील हजारो कामगार रोजगारासाठी येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या किंवा संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी बांगलादेशी विरोधी पथकाकडून विविध कंपन्यांमध्ये तपासणी मोहीमही राबविण्यात येत आहे. कामगारांची ओळखपत्रे, कागदपत्रे आणि वास्तव्यासंदर्भातील माहितीची पडताळणी केली जात आहे.

रायगड जिल्हा हा राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असून अलिबाग, वरसोली, मांडवा, नागाव, आक्षी, किहीम, मुरूड, काशीद, रेवदंडा, बोर्ली, दिवेआगर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. सुट्ट्यांच्या काळात आणि आठवड्याच्या शेवटी येथे मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांपैकी अलिबाग, मांडवा सागरी, मुरूड, वडखळ, श्रीवर्धन, दिघी सागरी, पोयनाड, रोहा आणि रेवदंडा ही सागरी पोलीस ठाणी किनारपट्टीवरील सुरक्षा सांभाळत आहेत.

अलिबाग, वरसोली, रेवस, मांडवा, धरमतर, बांगमांडला, दिघी प्रवासी जेट्टी, पीएनपी, सानेगाव, जेएसडब्ल्यू, राजपुरी जेट्टी तसेच दिघी पोर्ट येथे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये धरमतर पोर्ट येथे ५१, मांडवा जेट्टी येथे २४, दिघी पोर्ट येथे २१ आणि सानेगाव जेट्टी येथे १६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

या यंत्रणेमुळे समुद्रकिनारी, बंदर परिसरात तसेच जेट्टी भागात हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होत असून संशयित व्यक्तींवर सतत नजर ठेवली जात असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande