रत्नागिरी : जिल्हा महिला पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : दीपक पटवर्धन
रत्नागिरी, 26 जून (हिं.स.) । येथील जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले. महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाल्या
जिल्हा महिला पतसंस्थेतर्फे फेडरेशनचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांचा सत्कार


रत्नागिरी, 26 जून (हिं.स.) । येथील जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महिला पतसंस्थेने ॲड. पटवर्धन यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दिवंगत खासदार गोविंदरावजी निकम यांनी कोकणात सहकाराचे बीज पेरले. अनेक सहकारी संस्था काढल्या. महिला पतसंस्थाही त्यापैकीच एक आहे. सहकारात काम करावयाचे असेल तर कोणताही पक्षभेद न करता कसे काम करावे याचे योग्य मार्गदर्शन कै. निकम यांनी केल्यामुळे मी सहकारामध्ये गेली ३५ वर्षे चांगले काम करू शकलो. जिल्हा महिला पतसंस्थेचे काम गेली अनेक वर्षे पाहत आलो आहे. खऱ्या अर्थाने सहकाराचे काम ही संस्था करत आहे. ज्या महिलांना कुठेही कर्ज मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या मागास, दीनदुबळ्या, ज्यांचे उत्पन्न जेमतेम आहे अशा महिलांना ही संस्था कर्ज देऊन त्यांना आर्थिक बळ देऊन महिलांचे खरे सक्षमीकरण करत आहे. संस्थेकडून झालेला सत्कार हा माझ्या दृष्टीने घरगुती, अतिशय हृद्य सत्कार असून मी भारावून गेलो आहे. आपल्या संस्थेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मी नक्कीच सकारात्मक प्रयत्न करेन.

महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के यांनी संस्थेच्या कार्याबद्दल आढावा घेतला. संस्थेला व्यवहार करताना कोणत्या अडचणी येत आहेत, याबाबत विचार मांडून महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. पटवर्धन यांची योग्य वेळी निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे व्यवहार, समस्यांची जाण आपल्याला आहेच. त्यामुळे त्या अडचणी शासन दरबारी उत्तमरीत्या मांडून सकारात्मक निर्णय कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिवंगत खासदार गोविंदराव निकम यांनी ही महिला पतसंस्था स्थापन करताना जी मार्गदर्शक तत्त्वे आम्हाला घालून दिली आहेत. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गेली ३५ वर्षे संस्थेची यशस्वी वाटचाल चालू ठेवली आहे. आज १४ हजार महिला सभासद आहेत. सर्व संचालिका चांगले काम करत आहेत. संस्थेचा कणा म्हणजे कर्मचारी अतिशय मेहनती, प्रामाणिकपणे पारदर्शक व्यवहार करीत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे राजेशिर्के यांनी नमूद केले.

सूत्रसंचालन करताना संचालिका प्राची शिंदे यांनी ॲड. पटवर्धन यांच्या सहकारातील गेल्या ३० वर्षांच्या योगदानामुळे त्यांची महाराष्ट्र फेडरेशन अध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्या दृष्टीने एक योग्य व्यक्तीची या पदी निवड झाली आहे, याचा आनंद वाटतो, असे सांगितले.संस्थेच्या उपाध्यक्ष सुजाता तांबे यांनी आभार मानले व आपले अनुभव सांगितले. याप्रसंगी लांजा शाखेच्या संचालिका स्वप्ना सावंत, व्यवस्थापिका आदिती पेजे, सचिव कृतिका सुवरे, तसेच कर्मचारी उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande