
मुंबई, 27 जून (हिं.स.)। 'बेबी डू डाय डू' या चित्रपटातील 'इश्क कमीना' हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच, अभिनेता रचित सिंग याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. या प्रतिष्ठित बॉलीवूड गाण्याशी जोडले जाणे हे त्याच्यासाठी एखाद्या स्वप्नपूर्तीसारखे असल्याचे त्याने लिहिले. हे गाणे चित्रपटाचा भाग असणार आहे, ही बातमी ऐकून संपूर्ण टीम खूप उत्साहित झाली होती, असेही रचितने नमूद केले.
आपल्या पोस्टमध्ये रचित सिंगने शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबद्दलची आपली आदरभावनाही व्यक्त केली. त्याने लिहिले, काही भावना शब्दांत मांडता येत नाहीत. शाहरुख सर आणि ऐश्वर्या मॅडम यांच्याशी संबंधित असलेल्या या प्रतिष्ठित गाण्याचा भाग असणे, ही माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखी गोष्ट आहे. मी स्वतःवर ईश्वराची कृपा मानतो आणि मी नेहमीच त्यांचा चाहता राहिलो आहे. त्याचा हा संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या गाण्याच्या प्रदर्शनामुळे 'बेबी डू डाय डू' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. नचिकेत सामंत दिग्दर्शित या चित्रपटात हुमा कुरेशी, चंकी पांडे, सिकंदर खेर, सीमा पाहवा आणि रचित सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रहस्य आणि थराराने भरलेला हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर