रत्नागिरी : बेदखल कुळांच्या प्रश्नाबाबत बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमचे कलम ४(२) मधील दुरुस्तीनुसार पुराव्यांचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कुळांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कुळांना न्याय मिळावा, असे निवेदन बहुजन विकास आघाडीतर्फे लांज्याच्या तहसी
बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन


रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमचे कलम ४(२) मधील दुरुस्तीनुसार पुराव्यांचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कुळांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कुळांना न्याय मिळावा, असे निवेदन बहुजन विकास आघाडीतर्फे लांज्याच्या तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले यांना देण्यात आले. यावेळी बहुजन विकास आघाडीचे नेते सुरेश भायजे आणि शिष्टमंडळाने तहसीलदारांशी सविस्तर चर्चा केली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांचा प्रलंबित प्रश्नाबाबत आणि गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बहुजन विकास आघाडीने गेली अनेक वर्षे संघर्ष केला. सन २००२ आणि २००६ साली कुळ कायद्यातील कलम ४(२) मध्ये दुरुस्ती करण्यात आली. तरीदेखील अधिकारी वर्गाकडून कुळांना न्याय मिळकत नसल्याचे अनेक कुळांकडून सांगण्यात येत आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे दोन्ही जिल्ह्यांमध्ये सर्व तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येणार आहेत.

बहुजन विकास आघाडीच्या यापूर्वीच्या आंदोलनामुळे जर अशी व्यक्ती सातत्याने ती जमीन कसत असल्याच्या तितकेच परिस्थितीजन्य साक्षी पुरावा असल्यास आणि त्या गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि त्या व्यक्तीच्या जमिनीलगत लागून असलेल्या जमिनीचा उक्त जमीन त्या व्यक्तीच्या कब्जात असल्याचे आणि त्या व्यक्तीकडून जी जमीन १२ वर्षांपेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी अखंडितपणे कसण्यात येत असल्याचे शपथपत्रावर कथन करीत असतील तर, अशी व्यक्ती, या कलमाच्या प्रयोजनांसाठी कुळ असल्याचे मानण्यात येईल. अशी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमचे कलम ४(२) मध्ये दुरुस्ती केली आहे. यानुसार कुळांना न्याय मिळावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बविआ नेते सुरेश भायजे, चंद्रकांत परवडी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. स्मिता मांडवकर, तालुकाध्यक्ष दिलीप चौगले, नंदकुमार आंबेकर, संभाजी काजरेकर यांनी बेदखल कुळांच्या प्रश्नासंदर्भात तहसीलदारांशी सविस्तर चर्चा केली व बेदखल कुळांच्या प्रश्नाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.

निवेदन देण्यासाठी प्रकाश मांडवकर, विलास खर्डे, वसंत घडशी, संजय गोंधळी, आत्माराम करंबेळे, सुभाष मसणे, यशवंत घडशी, सुरेश गावडे, शांताराम गाडे, अजय नेमन, जयवंत खुलम, दीपक निवाते, काशिनाथ पोसकर, प्रभाकर सनगरे, रघुनाथ भितळे, संतोष चांदे, वसंत देवळेकर, मंगेश मोरे, हर्षद तरळ, संदीप घडशी तसेच तालुक्यातील बविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande