
नाशिक, 04 जून (हिं.स.)।
- नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सध्या अडचणीत सापडले आहेत. तर निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
याप्रकरणात मतीन पटेल यांची नाशिकच्या एसआयटी पथकाने दोन-तीन वेळा चौकशी केली आहे. त्यांनी निदा खान हिच्याशी कशी भेट झाली, ते तिला कसे ओळख होते याची माहिती दिली. तर त्याचवेळी विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
पटेल यांनी सांगितले की, इम्तियाज जलील यांना कॉल करून देण्याची विनंती पोलिसांकडे केली. इम्तियाज जलील यांना काहीही माहिती नव्हती. इम्तियाज जलील हे माझे नेता आहेत, मला काहीही अडचण आली तर मी जलील यांना फोन करतो. या प्रकरणात इम्तियाज
जलील यांचा काहीही संबंध नाही. निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक नाही, जो कुणी असे सांगतोय तो खोटे बोलत आहे. त्यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असा खुलासा नगरसेवक मतीन पटेल यांनी केला.
पालकमंत्र्यांचे इम्तियाज जलील यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच ते सारखे सारखे त्यांचे नाव घेत असल्याचा चिमटाही मतीन पटेल यांनी काढला. निदा खान ही जेव्हा वास्तव्याला होती, तेव्हा इम्तियाज जलील यांच्याशी बोलणेच झाले नाही. आमच्यात कोणताही फोन झाला नाही. माझ्या फोनमध्ये रेकॉर्डीग्स आहेत. इम्तियाज जलील यांचा याप्रकरणाशी काही संबंध नाही, असा दावा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी केला आहे. निदा खानला मी यापूर्वी कधीही भेटलो नाही, तिचे आई-वडिल दोन-तीन दिवसांसाठी घर हवे आहे असे मला भेटून म्हणाले. निदा ही गरोदर असल्याने आणि तिचे काही वाद झाल्याने तिला घर हवे असल्याचे त्यांनी सांगितल्याचे पटेल म्हणाले. त्यामुळे तिला राहण्यासाठी घर दिल्याचे पटेल म्हणाले. मी काही चुकीचे केले नाही, त्यामुळे याप्रकरणात कोर्टात लढा देणार असल्याचे मतीन पटेल यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV