
मुंबई, 05 जून (हिं.स.)। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी किरकोळ महागाई दराचा अंदाज वाढवून ५.१ टक्के केला आहे. यापूर्वी आरबीआयने महागाई दर ४.६ टक्क्यांवर राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी येथे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या द्वैमासिक चलनविषयक धोरण समिती (एमपीसी)च्या तीन दिवसीय आढावा बैठकीतील निर्णयांची घोषणा करताना सांगितले की, जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय, वस्तूंच्या किमतींतील चढ-उतार, मान्सूनबाबतची अनिश्चितता आणि एल निनो सारख्या परिस्थितींमुळे महागाई वाढण्याचा धोका कायम आहे.
जून महिन्याच्या चलनविषयक धोरणाची घोषणा करताना संजय मल्होत्रा म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे कच्च्या मालाच्या खर्चात वाढ झाली असून, हे महागाई वाढण्यामागील प्रमुख कारण आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत पेट्रोलच्या किरकोळ किमतींमध्ये एकूण ७.४ टक्के, तर डिझेलच्या किमतींमध्ये ८.४ टक्के वाढ झाली आहे.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, अन्नधान्य महागाईत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी मार्च आणि एप्रिल महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर राहिल्याने इंधन महागाई दर नियंत्रणात राहिला. त्यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये महागाई दर ३.२ टक्क्यांवरून किंचित वाढला असला तरी मार्च आणि एप्रिलमध्ये एकूण किरकोळ महागाई दर लक्ष्यापेक्षा कमी राहिला. तो अनुक्रमे ३.४ टक्के आणि ३.५ टक्के इतका होता. मुख्य महागाई दर मार्च-एप्रिलदरम्यान ३.७ टक्क्यांवर स्थिर राहिला. तर मौल्यवान धातू वगळता मुख्य महागाई दर याच कालावधीत आणखी घसरून २.१ ते २.२ टक्क्यांपर्यंत आला.
मल्होत्रा यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती (भारतातील आयात खर्चाच्या दृष्टीने) एप्रिल-मे २०२६ दरम्यान सरासरी सुमारे ११० डॉलर प्रति बॅरल राहिल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये या किमती पूर्वीच्या अंदाजापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त राहण्याचे संकेत आहेत. ते म्हणाले की, ऊर्जेच्या वाढलेल्या किमती आणि विविध कच्च्या मालाच्या खर्चातील वाढ यामुळे एप्रिल २०२६ मध्ये घाऊक महागाई दरात (डब्ल्यूपीआय) तीव्र वाढ दिसून आली.
तिमाहीनिहाय किरकोळ महागाई दराचा अंदाज पहिल्या तिमाहीत ४.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ५.१ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ५.९ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.४ टक्के असा व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी एकूण महागाई दर ४.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याच्या अंदाजामुळे आणि एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याशी संबंधित परिस्थिती अनिश्चित आहे. महागाई वाढण्याचे धोके वाढले असले तरी अधिक स्पष्टता येईपर्यंत प्रतीक्षा करणे योग्य ठरेल, असा निर्णय चलनविषयक धोरण समितीने आढावा बैठकीत घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule