जयपूर फिरण्यासाठी आलेल्या युगांडाच्या तरुणीमध्ये इबोलासदृश लक्षणे आढळली
आरोग्य विभागात खळबळ जयपूर, 05 जून (हिं.स.)। युगांडाहून जयपूर फिरण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय परदेशी तरुणीमध्ये इबोला विषाणूसारखी लक्षणे आढळून आली आहेत. तिला राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठ (आरयूएचएस) रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात
Ugandan woman Ebola like symptoms


आरोग्य विभागात खळबळ

जयपूर, 05 जून (हिं.स.)। युगांडाहून जयपूर फिरण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय परदेशी तरुणीमध्ये इबोला विषाणूसारखी लक्षणे आढळून आली आहेत. तिला राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठ (आरयूएचएस) रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या संसर्गाची पुष्टी झालेली नसून तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र, राजस्थानच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा देत अलर्ट मोड स्वीकारला आहे.

ही तरुणी शुक्रवारी सकाळी एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहमार्गे जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली होती. विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नियमित वैद्यकीय तपासणी दरम्यान वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयाच्या पथकाने तिला संशयित श्रेणीत ठेवले. तिचा प्रवास इतिहास युगांडाशी संबंधित असल्याने आणि काही आरोग्यविषयक लक्षणे आढळल्याने तिला तातडीने विशेष प्रोटोकॉलनुसार आरयूएचएस रुग्णालयात पाठविण्यात आले.

आरयूएचएस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल गुप्ता यांनी सांगितले की, तरुणीला ताप, डोकेदुखी, पोटदुखी आणि भूक न लागणे अशा तक्रारी होत्या. प्राथमिक तपासणीत इबोला संसर्गासारखी काही लक्षणे आढळली असली तरी केवळ लक्षणांच्या आधारे त्याला इबोला संसर्ग म्हणता येणार नाही. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच संसर्गाची पुष्टी होऊ शकेल. उपचारासाठी मेडिसिन, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, शस्त्रक्रिया, श्वसनरोग चिकित्सा, बायोकेमिस्ट्री आदी विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे. रुग्णाच्या देखरेखीकरिता २४ तास डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची विशेष ड्युटी लावण्यात आली आहे.

आरयूएचएसचे प्राचार्य डॉ. मोहनीश ग्रोव्हर यांनी सांगितले की, तरुणीचा एक नमुना तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आला आहे, तर दुसरा नमुना ४८ तासांनंतर पाठविण्यात येणार आहे. दोन्ही तपासणी अहवाल येईपर्यंत रुग्णाला क्वारंटाइन आणि आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास निर्धारित प्रोटोकॉलनुसार २१ दिवस देखरेखीखाली ठेवून उपचार केले जातील.

डॉ. ग्रोव्हर यांनी सांगितले की, तरुणीला विमानतळावरून रुग्णालयात पूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह आणण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विशेष बॅरिकेडिंग आणि स्वतंत्र मार्गिकेचा वापर करण्यात आला. रुग्णाला आरयूएचएसच्या क्रिटिकल केअर ब्लॉकमधील आपत्कालीन आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने तरुणीसोबत प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांची ओळख पटवून त्यांनाही खबरदारीच्या दृष्टीने आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रवाशामध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर संशयास्पद लक्षणे दिसल्यास त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

इबोलाबाबत लोकांमध्ये पसरत असलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आरयूएचएसचे प्राचार्य डॉ. मोहनीश ग्रोव्हर यांनी स्पष्ट केले की, हा आजार हवेमार्फत पसरत नाही. त्यांनी सांगितले की, संसर्ग वातावरणातून पसरतो अशी सामान्य लोकांमध्ये चुकीची समजूत निर्माण होत आहे; मात्र वैज्ञानिकदृष्ट्या तसे नाही.

डॉ. ग्रोव्हर यांच्या मते, संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कातून, तिच्या शारीरिक द्रवांद्वारे, त्वचा, जखमा किंवा शिंकताना-खोकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या संपर्कातून संसर्गाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे सामान्य परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही; मात्र खबरदारी आणि सतर्कता आवश्यक आहे. सध्या हे केवळ एक संशयित प्रकरण आहे. पुणे येथील एनआयव्हीच्या तपासणी अहवालानंतरच संबंधित तरुणीला इबोला विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande