
मे महिन्याच्या तापाने होरपळून गेलेल्या प्रत्येक जीवाला त्या थेंबांची गरज वाटत होती. पूर्ण जून महिना संपून पावसाने हजेरी लावली आणि धरतीसह सारी गारव्यात सुखावली असे वाटत असतानाच थोड्याश्याच पडलेल्या धारांनी सारे जन जीवन विस्कळीत झाले. जो तो पावसालाच दोष देऊ लागला. तेव्हा त्याच्या मनात काय विचार आले असतील ह्याचा विचार माणसाने केला का ?
तेव्हाही कोसळलो होतो, तसाच आजही बरसत आहे...
तेव्हा माणसे जंगलात होती, आज माणसांचे जंगल आहे...
आज माणसांचे जंगल आहे ही प्रतिमा अधिक तीक्ष्ण वाटत असली तरी ते वास्तव आहे. कुणी म्हणेल ती प्रगती आहे काळाबरोबर आपल्याला बदलले पाहिजेच. चला मान्य आहे आपण जंगलात राहू शकणार नाही पण जिथे जंगल आहे तिथेच अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत, झालेली जंगलतोड पुन्हा झाडे लावण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने केवळ सिमेंटचे जंगल वाढत आहे. जसे जमिनीवर वाढत आहे तसेच जमिनीखाली सुद्धा वाढत आहे ह्याकडे कुणाचे लक्ष नाही का जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येतो. बाह्य जंगलापेक्षा मनातील हिंसा, स्वार्थ, असंवेदनशीलता वाढत चालली आहे हा विषय अधिकच गहन आहे. आपण केवळ माणसांत पशुत्व आले एवढे म्हणत नाही, तर माणसांची संख्या, काँक्रीटचे जंगल आणि निसर्गाचा ऱ्हास होत राहिला, म्हणूनच पावसाला म्हणावेसे वाटते. “तेव्हाही कोसळलो होतो, तसाच आजही बरसत आहे...” थोडा कमी जास्त पडलो असेन पण मी माझे कर्तव्य बजावत असतो. त्यात केवळ अडथळे मानवांनी केले आणि मला दोष देत राहिले.
पावसाची व्यथा ही की,
मी फक्त पांढरा होतो, अलर्टच्या रंगी रंगलो...
चुका त्यांच्या कितीतरी, वाटे मीच रस्ता चुकलो...
तो मूळचा निरपेक्ष, पांढरा (निर्मळ) होता; पण माणसांच्या चुका, हवामानातील बदल आणि त्याच्या वातावरणीय वेगाला सततचे रेड, ऑरेंज, यलो अलर्ट यांमुळे जणू त्यालाच दोषी ठरवले जाते.
चुका त्यांच्या कितीक, वाटते मी रस्ता चुकलो ही व्यथा प्रभावीपणे व्यक्त होते. पावसाचा मूळ स्वभाव निर्मळ, निष्पाप आणि रंगहीन असलेली प्रतिमा विस्कळीत झालेल्या निसर्गचक्राचा साक्षीदार वाटते.
मी रस्ता चुकलो याचा अर्थ पाऊस स्वतःहून भरकटला नाही; माणसांनीच त्याचे मार्ग बदलले. जंगलतोड, डोंगर फोडणे, नद्यांचे अतिक्रमण, काँक्रीटचे विस्तार, उष्णता ह्या सर्वांमुळे तो कधी एका भागात प्रचंड कोसळतो, तर दुसरीकडे दुष्काळ ठेवतो. वाटते हा संशय नाही; तो आत्मपरीक्षण आहे. श्रेष्ठ व्यक्ती किंवा निसर्ग प्रथम स्वतःकडे पाहतो. चूक दुसऱ्याची असली तरी, माझ्याकडून काही कमी पडले का? हा प्रश्न तो स्वतःला विचारतो. त्यामुळे तो दोष स्वीकारत नाही, पण दोष वाढू नये म्हणून स्वतःचा विचार करतो आणि माणसाला सांगतो मी रस्ता बदलला नाही तर तुम्ही तो बदलला आहे.
कोसळत होतो वरुनी, जमिनीतही मी मुरत होतो...
उंचावल्या सिमेंटच्या भिंती, अडथळ्यांतच आता पोहतो...
पूर्वी व आज आणि पुढे हि पाऊस वरूनच पडेल, बरसेल, कोसळेल. तेव्हा तो जमिनीत मुरत होता, भूजल वाढवत होता; आता सिमेंटच्या रस्त्यामुळे तो मुरू शकत नाही. कारण जेव्हढे टॉवर जमिनीवर आकाशाला टेकत चालले आहेत तेव्हढेच ते जमिनी खाली हि आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीखालून वाहू शकत नाही. “ उंचावल्या सिमेंटच्या भिंती, अडथळ्यांतच आता पोहतो...” पोहण्याचे सोडा तो त्या अडथळ्यात गटांगळ्या खात फिरत आहे. आत शिरायला, मुरायला मिळाले नाही कि जमिनीवर वाहत प्रशासनाने नव्हे तर नागरिकांनी केलेल्या कचरा साठवणुकीत तो वाट काढतो. वाट मिळाली नाही कि तुंबतो आणि समोर येईल त्याला जमीनदोस्त करतो. पाऊस हा फक्त ऋतू नाही; तो माणसाला प्रश्न विचारणारा साक्षीदार आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्ग, समाज ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे. एका बाजूने भिंती म्हणजे घराच्या, इमारतीच्या तर आहेतच पण त्यापेक्षा अधिक वाढ नात्यांमधील विश्वासाची चौकट मोडून उभ्या राहिलेल्या भिंती आहेत. भिंती म्हणजे समाजव्यवस्थेचा पाया त्याच वाढल्या कि पुढे कोसळणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
बरसतो कुठे कोसळतो मी, का भिंती सहज कोसळती..
तुंबतो मी प्रत्येक रस्त्यात, त्यांच्याच कर्मात ते बुडती..
मी पडतो म्हणून भिंती पडतात का? भिंतीचा म्हणा किंवा नात्याचा पाया आधीच कमकुवत झाला म्हणूनच संकटे उभी रहातात. ती फक्त नात्यांची परीक्षा घेतात व इमारतींना उभ्या ठेवतात. पाया भक्कम असेल तर पाऊस ताजेपणा देतो; पाया कमकुवत असेल तर तेच पाणी भगदाड दाखवते.
“तुंबतो मी प्रत्येक रस्त्यात, त्यांच्याच कर्मात ते बुडती...” येथे कर्म हा शब्द दोषारोप करत नसून; तो कारण दाखवतो. रस्ते, गटारे, नाले, नियोजन, अतिक्रमण या सर्वांचा परिणाम अखेरीस माणसालाच भोगावा लागतो. येथे हि पाऊस स्वतःची बाजू मांडतो पण तो न्यायाधीश नाही; तो साक्षीदार आहे.
मला त्या चिमुकल्यांची, होडी पळवायची आहे...
की त्यांचे दुर्भाग्य, नजर स्क्रीनवर गुंतली आहे...
मागच्या पिढीने पावसात सोडलेल्या कागदाच्या होड्या आज पावसाला पळवता येत नाहीत कारण आजच्या पिढीला त्या आनंदाचा पत्ताच नाही. आजच्या मुलांकडे तंत्रज्ञान आहे हे भाग्य म्हणायचे की पावसात कागदी होडी सोडण्याचा आनंद हरवला हे दुर्भाग्य म्हणायचे? हा प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधणे दोन्ही पिढ्यांची गरज बनलेली आहे. येथे तो बालपणाच्या हरवलेल्या आनंदाबद्दल पाऊस हळवा होत आपल्या अस्तित्वाची, विविध रंगाची, गंधाची जाणीव नवीन पिढ्यांना करून देण्याची जबाबदारी टाळणाऱ्या जुन्या पिढीला जागे करतो.
नकोच आता माझे तुझे, तो काळ हा काळ करणे..
सुख सर्वांनाच असे प्रिय, विश्वप्रार्थनेत ते अनुभवणे..
तो काळ, हा काळ हा केवळ भूतकाळ-वर्तमानकाळाचा उल्लेख नाही; तर विभाजन, तुलना आणि वाद यांचे प्रतीक तो मांडतो. पुराणापासून तो ठरलेल्या ऋतू प्रमाणे पडत आला. धरेच्या प्रत्येक जीवाला तृप्त करत जगवत आला. म्हणून त्याला म्हणावेसे वाटते नकोच आता तुझे माझे जे आहे ते सर्वांचे आहे.
संत ज्ञानेश्वर माउलींनी सांगितले , “सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे”. तेच विज्ञानयुगात सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सांगितले. “तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या. खरा धर्म हो म्हणताती ह्या धारणेला. ” इतरांना म्हणजे सर्वांना, प्रत्येक जीवाला त्यांच्या त्यांच्यापरिने त्यांचे जीवन जगू द्या प्रत्येकाच्या मनात सुखाची भावना निर्माण करणाऱ्या विश्वप्रार्थनेची निर्मिती करून सद्गुरूंनी प्रत्येकाच्या हाती सुदर्शन चक्रच दिले आहे. विश्वप्रार्थनेत सर्वात महत्वाचा शब्द आहे ‘सर्वांना’. विश्वप्रार्थनेत जे काही मागतो ते आपल्यासाठी नसून सर्वांना मागतो आणि सर्वासाठी मागताना आपण हि सर्वामध्ये असतो. जेव्हा सर्वांचा विचार मनात रुजतो तेव्हा आपल्याकडून होणारी प्रत्येक कृती हि राष्ट्र हिताची व विश्व शांतीची असेल तेव्हा पावसाला आपली व्यथा मांडायची गरज पडणार नाही.
विठ्ठल बाबुराव घाडी,
कवी, लेखक, पत्रलेखक
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर