
रायगड, 11 जुलै (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनगरवाडी–चाफेवाडी रस्त्यावर अज्ञात तिघांनी गुरे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनगरवाडी–चाफेवाडी रोड परिसरात रस्त्याच्या कडेला बसलेल्या गुरांपैकी एका जनावराला आरोपींनी उचलून त्यांच्या ताब्यातील टोयोटा इटिओस (क्र. एमएच-01-एएक्स-4136) या कारमध्ये कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने भरत असताना फिर्यादी आणि साक्षीदार घटनास्थळी पोहोचले. त्यांची चाहूल लागताच आरोपींनी कारमध्ये बसून भरधाव वेगाने पळ काढला.
दरम्यान, सरकारी साक्षीदारांनी आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणतीही पर्वा न करता वाहन वेगाने चालवत घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२, ३(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १७९(१) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)