पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड
एकूण 52 उमेदवारांना नियुक्ती पत्र; 312 प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग चंद्रपूर, 11 जुलै (हिं.स.) :मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमार्फत 121 प्रशिक्षणार्थ्यांची
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड


एकूण 52 उमेदवारांना नियुक्ती पत्र; 312 प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

चंद्रपूर, 11 जुलै (हिं.स.) :मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमार्फत 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, 52 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.

या रोजगार मेळाव्यात एकूण 312 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल आणि क्रांतिकारी खुदीराम बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेतील प्रशिक्षणार्थी, आजी-माजी प्रशिक्षणार्थी तसेच बेरोजगार युवक-युवतींना विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.

या मेळाव्यात संभाजीनगर येथील इंड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. आणि एन.आर.बी. बिअरिंग, नाशिक येथील एन.व्ही.के. पॉवर तसेच चंद्रपूर येथील व्ही. आर. एंटरप्रायझेस, पार्श्व किया मोटर्स प्रा. लि., वैभव एंटरप्रायझेस आणि व्ही वन सी एंटरप्रायझेस या औद्योगिक आस्थापनांनी सहभाग नोंदविला.

सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांना संस्थेची कार्यपद्धती, उपलब्ध पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य विकास, वेतनश्रेणी, सेवा अटी, पदोन्नतीच्या संधी तसेच उद्योग क्षेत्रातील बदलत्या रोजगाराच्या गरजांविषयी मार्गदर्शन केले.

याशिवाय मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, शिस्त, कार्यसंस्कृती आणि व्यावसायिक आचारसंहिता याबाबतही उमेदवारांना माहिती देण्यात आली.

यानंतर सहभागी कंपन्यांकडून पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या प्रक्रियेत सहभाग घेतला. या मेळाव्यामुळे उमेदवारांना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची, रोजगाराच्या संधी समजून घेण्याची आणि शंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळाली.

संस्थेच्या प्राचार्या जे. व्ही. निंबार्ते आणि जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रोशन गभाले यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यशस्वीपणे पार पडला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande