अंधश्रद्धेविरोधात लढा उभारण्याची गरज - सुप्रिया सुळे
नाशिक, 11 जुलै, (हिं.स.) : पुरोगामी महाराष्ट्रात बुवाबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. आता 40 एकर जागेत त्याचा पसारा वाढला असून तरुण पिढीही त्याकडे आकर्षित होत आहे. अंधश्रद्धेविरोधात समाजाने पुन्हा एकदा ठाम लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्र
Need to wage a fight against


नाशिक, 11 जुलै, (हिं.स.) : पुरोगामी महाराष्ट्रात बुवाबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. आता 40 एकर जागेत त्याचा पसारा वाढला असून तरुण पिढीही त्याकडे आकर्षित होत आहे. अंधश्रद्धेविरोधात समाजाने पुन्हा एकदा ठाम लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या तथा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. बुवाबाजीविरोधात कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत, चांगल्या कामासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मविप्रच्या केबीटी महाविद्यालयातील सिव्हिल सेमिनार हॉल येथे शनिवारी झालेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार 2025-26 वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र नाशिकचे अध्यक्ष ड. नितीन ठाकरे होते.

सुळे म्हणाल्या, हा महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. विज्ञाननिष्ठ विचारांचा स्वीकार करून अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला समाजाने ठाम विरोध केला पाहिजे.

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असताना तेथे गुन्हेगारी वाढत आहे. तरुणाई ड्रग्जच्या आहारी जात आहे. पोलिसांचा धाक कमी होत चालला असून लोकप्रतिनिधींकडूनही पोलिसांवर हात उचलण्याच्या घटना घडत आहेत, ही गंभीर बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर मिश्कील भाष्य करताना सुळे म्हणाल्या, आम्हाला कधी काँग्रेसमध्ये, कधी शिवसेनेत, कधी भाजपमध्ये पाठवले जाते. आता फक्त मनसेमध्ये जाणे बाकी आहे. लोकप्रतिनिधींना बाजारातील वस्तूंप्रमाणे वागवले जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरजही मांडली.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणार्या तरुणांचा राज्यस्तरीय युवा पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदा सामाजिक, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, उद्योजकता, परफॉर्मिंग आर्ट्स आणि इनोव्हेशन या विविध क्षेत्रांतील युवा प्रतिभांना प्रत्येकी 21 हजार रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास सचिव अशोक पिंगळे, कोषाध्यक्ष विक्रांत मते, राजेंद्र डोखळे, सुरेखा बोर्हाडे, विजया गायकवाड, सुप्रिया मोरे, अशोक गायकवाड, मनिष लोणारी, वैभव टोचे, गणेश ढगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुरस्कार विजेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

यांचा झाला गौरव

यंदाचा सामाजिक युवा पुरस्कार दीक्षा दिंडे व प्रसाद गावडे, युवा क्रीडा पुरस्कार राजश्री गुगळे व सुकांत कदम, रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) विभागात नृत्य विभागासाठी वैष्णवी मोरे, लोककला विभागासाठी पृथ्वीराज माळी, वाद्य विभागासाठी युवराज सोनार आणि नाट्य विभागासाठी क्रांतीका खोत यांचा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. मराठी भाषा साहित्य युवा पुरस्कार क्षेता पाटील व कमलेश म्हाळे, युवा उद्योजकता पुरस्कार ऋतुजा दोरे आणि सुशांत देसाई, पत्रकारिता युवा पुरस्कार प्रियांका तुपे व श्रीकांत बंगाळे यांना तर, युवा इनोव्हेटर पुरस्कारासाठी पूर्वा महाजन आणि निखिल जाधव यांना प्रदान केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande