
- पन्हाळगड ते पावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी वाटचाल
कोल्हापूर, 11 जुलै (हिं.स.)। 'जय भवानी... जय शिवराय...'च्या अखंड जयघोषात, दाट धुके, गार वारा आणि पावसाच्या रिमझिम सरींच्या साक्षीने शिवराष्ट्र परिवार आयोजित पन्हाळगड–पावनखिंड प्रेरणायात्रेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाला मानवंदना देण्यासाठी ५०० हून अधिक शिवभक्त या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
मोहिमेच्या प्रारंभी वीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवराष्ट्र परिवारचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, शिवव्याख्याते दीपकराव करपे, भूपाल शेळके, संतोष शेळके आणि विजयसिंह सोळंके यांच्या हस्ते पूजन झाले.
दरम्यान खोतवाडी मुक्कामाच्या ठिकाणी शिवव्याख्याते दीपकराव करपे यांनी पन्हाळगड-पावनखिंड रणसंग्रामाचा इतिहास सर्वांसमोर उभा केला. वीररस भाषेत पन्हाळगड पावनखिंड मोहिमेदरम्यान घडलेल्या इतिहासाची पैलू त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सांगितले. त्यांच्या व्याख्यानामुळे शिवभक्त शिवकाळात गेले. पदभ्रमंती आणि व्याख्यानामुळे शिवचरित्रातील शौर्य, त्याग आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचा शिवभक्तांना प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे.
शिवप्रेम, राष्ट्रभक्ती आणि इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेला सर्व वयोगटातील शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला. राजेंद्र पोवार, भूपाल शेळके हे मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. सुखदेव इल्ले, मोहन खोत, कृष्णा तोर, नंदकुमार रहाणे, गणेश कदम, विनायक जाधव, रोहित ढिसाळ, विशाल मोरे, श्रेयश भंडारी, विजय खोत, पूजा खोत, धैर्यशील कदम यांच्यासह राज्यभरातून पाचशेहून अधिक शिवभक्त पावनखिंड मोहिमेत सहभागी झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar