नाशिक - नंदिनी नदीच्या दुतर्फा ६ हजार देशी वृक्षांची लागवड
उन्नत नाशिक अभियानांतर्गत आज वृक्षारोपण मोहीम नाशिक, 11 जुलै, (हिं.स.)। ''उन्नत नाशिक अभियान'' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ''हरित कुंभ–हरित मान्सून'' अर्थात ''मिशन ग्रीन मान्सून'' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात रविवार, १२ जुलै रोजी न
नाशिक - नंदिनी नदीच्या दुतर्फा ६ हजार देशी वृक्षांची लागवड


उन्नत नाशिक अभियानांतर्गत आज वृक्षारोपण मोहीम

नाशिक, 11 जुलै, (हिं.स.)। 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'हरित कुंभ–हरित मान्सून' अर्थात 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात रविवार, १२ जुलै रोजी नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर ६ हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

शहर अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने प्रशासन व नागरिकांच्या लोकसहभागातून 'उन्नत नाशिक अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यापूर्वी सातपूर देवराई, शिंदे ग्रामपंचायत हद्द, मसरूळ वनराई (पिकॉक गार्डन) आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील ग्रेप काउंटी रिसॉर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या नंदिनी नदी महास्वच्छता अभियानात ६१ टनांहून अधिक कचरा काढण्यात आला. तसेच नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून सुमारे चार लाख घनमीटर गाळ उपसण्यात आल्याने नदीची प्रवाहक्षमता आणि पाणी साठवण क्षमता वाढली आहे. आता नदीच्या दोन्ही तीरांवर देशी वृक्षांची लागवड करून नंदिनी नदीला कायमस्वरूपी हरित संरक्षण कवच देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.या अभियानाचा शुभारंभ पिंपळगाव बहुला येथील महादेव मंदिर, नंदिनी नदी परिसरात नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, पखाल रोड, मुंबई नाका येथून दहा ठिकाणी टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

या अभियानात स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी, विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी, युवक संघटना, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नामदार गिरीश महाजन यांनी नाशिककरांना या अभियानात सहभागी होऊन किमान एका वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

नंदिनी नदी स्वच्छता अभियानाला नागरिकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद हा पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची ताकद दाखवून देणारा होता. आता त्याच जनशक्तीच्या बळावर नंदिनी नदीच्या दुतर्फा वृक्षलागवड करून आपण हरित नाशिकचा संकल्प साकार करणार आहोत. वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संवर्धन करणेही आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन कमान एका वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून देशासमोर उभे करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

- गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande