
रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । जागतिक लोकसंख्या दिन आणि लोकसंख्या स्थिरता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात आज विविध जनजागृती उपक्रम करण्यात आले. त्याचा प्रारंभ पावस (ता. रत्नागिरी) प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.
लोकसंख्या स्थिरीकरण, कुटुंब नियोजन आणि माता-बाल आरोग्याबाबत विशेष जनजागृती कार्यक्रम पावस येथे पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य ऍड. महेंद्र मांडवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व विशद करताना वाढत्या लोकसंख्येचे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिणाम स्पष्ट केले. दोन जन्मातील अंतर, कुटुंब सदृढ निरंतर या घोषवाक्याचे महत्त्व विशद करून त्यांनी लोकसंख्या स्थिरीकरणासाठी कुटुंब नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. शासनामार्फत उपलब्ध असलेली विविध कुटुंब नियोजन साधने व सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नियोजित कुटुंबामुळे माता व बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ राहण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थी महिलांचा महेंद्र मांडवकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात मांडवकर यांनी कुटुंब नियोजनामध्ये महिलांचे योगदान मोलाचे असले तरी पुरुषांनीही पुढाकार घेऊन पुरुष नसबंदीबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन केले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकाने घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमास पावस परिसरातील महिला, पुरुष तसेच विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी