रत्नागिरी : घरडा इंजि. कॉलेजतर्फे १४ जुलैपासून विविध पर्यावरण विषयक उपक्रम
रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । कोकणातील जैवविविधतेचे संवर्धन, दुर्मिळ वनस्पती प्रजातींचे संरक्षण आणि पर्यावरणीय अन्नसाखळी मजबूत करण्याच्या उद्देशाने घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (लवेल, ता. खेड) येथे १४ जुलैपासून देवराई प्रकल्प, धनेश पक्षिसंवर्धन
रत्नागिरी : घरडा इंजि. कॉलेजतर्फे १४ जुलैपासून विविध पर्यावरण विषयक उपक्रम


रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । कोकणातील जैवविविधतेचे संवर्धन, दुर्मिळ वनस्पती प्रजातींचे संरक्षण आणि पर्यावरणीय अन्नसाखळी मजबूत करण्याच्या उद्देशाने घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (लवेल, ता. खेड) येथे १४ जुलैपासून देवराई प्रकल्प, धनेश पक्षिसंवर्धन प्रकल्प आणि वृक्ष वाचनालय (ट्री लायब्ररी)' या पर्यावरणपूरक उपक्रमांची सुरुवात होणार आहे.

या प्रकल्पाची माहिती जीआयटीचे प्रकल्प अधिकारी व अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर यांनी दिली. या उपक्रमासाठी जीआयटी, सह्याद्री संकल्प सोसायटी (देवरूख) आणि चिपळूण वन विभाग यांच्यात त्रिपक्षीय सहकार्य करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या परिसरातील सुमारे तीन एकर जागेवर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात कोकण व पश्चिम घाटातील ५० हून अधिक स्थानिक आणि दुर्मिळ वृक्षप्रजातींची ५५० हून अधिक रोपे लावण्यात येणार आहेत. या रोपांची उपलब्धता सह्याद्री संकल्प सोसायटी आणि वन विभागाच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

प्रकल्पांतर्गत प्रत्येक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्याने एक वृक्ष दत्तक घेण्याची वृक्ष दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. दत्तक घेतलेल्या वृक्षाची देखभाल, संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे असेल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत उत्तरदायित्वाची भावना विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

देवराई प्रकल्पाद्वारे स्थानिक जैवविविधतेला पोषक असे नैसर्गिक जंगल विकसित करण्यात येणार आहे. धनेश पक्षिसंवर्धन प्रकल्पांतर्गत धनेश पक्ष्यांच्या अधिवासासाठी आवश्यक फळझाडांची लागवड केली जाणार असून, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या पुनर्स्थापनेवर भर दिला जाणार आहे.

याशिवाय वृक्ष वाचनालय या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक वृक्षाला क्यूआर कोड देण्यात येणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर त्या वृक्षाची वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि औषधी माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी हा परिसर अभ्यासाचे केंद्र ठरणार आहे.

या प्रकल्पासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीचे संचालक प्रतीक मोरे यांनी दुर्मिळ वृक्षप्रजातींची निवड आणि तांत्रिक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चिपळूण वन विभागाने दुर्मिळ स्थानिक प्रजातींची रोपे उपलब्ध करून देत प्रकल्पाला सहकार्य केले आहे.

जीआयटीचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील आणि उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे आभार व्यक्त केले असून हा प्रकल्प पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातील एक आदर्श उपक्रम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande