



लंडन, 11 जुलै (हिं.स.)भारतीय फलंदाजीतील दिग्गज सचिन तेंडुलकरने विम्बल्डनमध्ये टेनिसमधील दिग्गज रॉजर फेडररला भेटल्यानंतर त्याच्यासाठी एक भावनिक संदेश शेअर केला आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेडररसोबतच्या आपल्या मैत्रीला खास संबोधत सचिनने लिहिले, काही रॅली कधीच संपत नाहीत. आपली मैत्री त्यापैकीच एक आहे. रॉजर, तुझ्यासोबत वेळ घालवणे नेहमीच आनंददायी असते. पुन्हा भेटेपर्यंत.
सचिनची विम्बल्डन भेट खूपच संस्मरणीय ठरली. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान प्रतिष्ठित रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांमध्ये त्याचा समावेश होता. त्याने अनेक दिग्गज खेळाडू आणि क्रीडा व्यक्तिमत्त्वांसोबत सामन्याचा आनंद घेतला.
भारताचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलदेखील रॉयल बॉक्समध्ये उपस्थित होता. गिलने रॉयल बॉक्समधून विम्बल्डनचा सामना पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. या ऐतिहासिक स्पर्धेचा भाग होण्यासाठी त्याने आपल्या इंग्लंड दौऱ्यातून वेळ काढला होता. फुटबॉल स्टार आणि लिव्हरपूलचा कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाइक आणि लीड्स युनायटेडचे अध्यक्ष पराग मराठे हेही उपस्थित होते.
सचिनच्या भेटीदरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारासोबतच्या त्याच्या संभाषणाने क्रिकेट चाहत्यांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे दोन्ही क्रिकेटपटू मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी होते, पण क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून ते अनेक प्रदर्शनीय आणि चॅरिटी सामन्यांमध्ये एकत्र खेळले आहेत आणि त्यांची मैत्री आजही टिकून आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे