भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज संदीप पाटील यांची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये खास उपस्थिती
मुंबई, 11 जुलै (हिं.स.)। सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ''महाराष्ट्राची हास्यजत्रा'' गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे. दर्जेदार विनोद, कलाकारांची अफलातून सादरीकरणे आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जुळल
भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज संदीप पाटील यांची सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये खास उपस्थिती


मुंबई, 11 जुलै (हिं.स.)। सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे. दर्जेदार विनोद, कलाकारांची अफलातून सादरीकरणे आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जुळलेली नाळ यामुळे हा कार्यक्रम आज घराघरातील आवडीचा ठरला आहे. याच लोकप्रियतेची प्रचिती आगामी सोमवारच्या विशेष भागात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज संदीप पाटील, त्यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते चिराग पाटील, तसेच नात रियाना पाटील, अशा तीन पिढ्या एकत्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमातील भन्नाट स्किट्सचा मनमुराद आनंद घेत त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणालाही भरभरून दाद दिली.

यावेळी संदीप पाटील म्हणाले, खूप दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर येण्याची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली, याचा खूप आनंद आहे. आम्ही घरी आवर्जून आणि नियमितपणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहतो. कार्यक्रमातील अनेक स्किट्स मला इतकी आवडतात की ती अक्षरशः पाठ झाली आहेत. ती स्किट्स मी इतक्या वेळा पाहिली आहेत. एकीकडे जर क्रिकेटची मॅच सुरू असेल आणि दुसरीकडे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सुरू असेल, तर माझं संपूर्ण लक्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'कडेच असतं. एवढा हा कार्यक्रम मला आवडतो. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर आणि बलविंदर संधू यांच्यासोबतच मराठी न समजणारे आमचे अनेक मित्रही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आवर्जून पाहतात. हा कार्यक्रम भाषेच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला मनापासून हसवतो, हीच त्याची खरी ताकद आहे.

एका कार्यक्रमाने तीन पिढ्यांना एकत्र आणत दिलेला आनंद आणि त्याच्याशी निर्माण झालेलं भावनिक नातं या विशेष भागातून अनुभवायला मिळणार आहे. संदीप पाटील, चिराग पाटील आणि चिमुकली रियाना यांनी कलाकारांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि हास्याने भरलेले वातावरण या भागाला आणखी खास बनवणार आहे.

हास्याचे भन्नाट स्किट्स, तीन पिढ्यांची खास उपस्थिती आणि संदीप पाटील यांच्या मनोगताने सजलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चा हा विशेष भाग पाहायला विसरू नका.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' — दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande