
लातूर, 14 जुलै (हिं.स.)। यशवंत विद्यालय बॅच २००६ च्या माजी विद्यार्थ्यांनी केवळ जुन्या आठवणींना उजाळा न देता, सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उपक्रम राबवला आहे. आपल्या गेट-टुगेदर कार्यक्रमातून वाचलेल्या निधीचा उपयोग करून या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालयातील गरजू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 'ट्रॅक सूट' गणवेशाचे वाटप केले आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या यशवंत विद्यालय बॅच २००६ च्या स्नेहमेळाव्यानंतर, कार्यक्रमाच्या नियोजनातून पन्नास हजार रुपयांची रक्कम शिल्लक राहिली होती. ही रक्कम मौजमजेवर खर्च न करता, ती समाजोपयोगी कामासाठी खर्च करण्याचा एकमताने निर्णय सर्व मित्रांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करत आज एका छोट्या कार्यक्रमात मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन ट्रॅक सूट भेट देण्यात आले.
नवीन गणवेश परिधान केल्यानंतर त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद पाहून माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सार्थक झाले. शाळा सुटली तरी संस्कार सुटत नाहीत, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, 'गेट-टुगेदर'चे हे सर्वात मौल्यवान 'रिटर्न गिफ्ट' असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमाचे यशस्वी नियोजन आणि त्यामध्ये योगदान दिल्याबद्दल यशवंत विद्यालय बॅच २००६ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सामाजिक जाणिवेचे हे पाऊल इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis