विद्यार्थ्यांच्या भावना दाबण्याच्या बाजूने नाही - चिराग पासवान
:
मी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याच्या बाजूने नाही- चिराग पासवान


नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांकडून झालेल्या बळाच्या वापराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्यांचा आदर करण्याची भूमिका मांडली. मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार संवादासाठी नेहमीच तयार असल्याचे स्पष्ट केले.

चिराग पासवान म्हणाले की, विविध मुद्द्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आणि चिंता निर्माण झाली असून, त्यामुळे त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. मी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याच्या बाजूने नाही. संवाद हेच प्रश्न सोडविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे आणि सरकारने संवादासाठी आपले दरवाजे नेहमीच खुले ठेवले आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, काल त्यांच्या प्रतिनिधीमंडळाने (कॉकरोच जनता पार्टी) जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावरून सरकार चर्चेसाठी सदैव तयार असल्याचे स्पष्ट होते.

कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बोलताना पासवान म्हणाले, कधीकधी लोकांचा रोष इतका वाढतो की ते रस्त्यावर उतरतात. मात्र, आंदोलनादरम्यान मर्यादा ओलांडल्या गेल्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर प्रशासनाला काही कठोर पावले उचलावी लागतात.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या बळाच्या वापराबाबत त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. मी बळाच्या वापराचे समर्थन करत नाही. विद्यार्थी आणि तरुण हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या भावना आणि मागण्यांचा आदर केला गेला पाहिजे. यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, सोमवारी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरपासून संसद भवनापर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर-मंतर येथे जमले होते. मोर्चादरम्यान काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत काही ठिकाणी लाठीचार्ज केला. या घटनेवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली असून, हा मुद्दा संसदेतही गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande