विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा
मुंबई, 21 जुलै (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. ''अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता ''घबाडकुंड'' ला मि
Horror


मुंबई, 21 जुलै (हिं.स.)।

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. 'अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता 'घबाडकुंड' ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच 'खिचिक', 'डॉक्टर डॉक्टर' आणि 'ढिशक्यांव' यांसारख्या चित्रपटांनंतर 'अल्याड पल्याड' आणि 'घबाडकुंड' या दोन सलग यशस्वी हॉररपटांनी त्यांच्या नावावर बॅक-टू-बॅक हिट्सची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे, 'घबाडकुंड' च्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स दिले. भय, रहस्य, अॅक्शन, इमोशन आणि थराराचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. 'घबाडकुंड'चे निर्माते डॉ. रसिक कदम (आयकॉन द स्टाईल) यांनी प्रीतम एस. के. पाटील यांच्या दिग्दर्शनावर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांना सातत्याने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या विश्वासामुळेच 'घबाडकुंड'सारखा भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार चित्रपट साकार होऊ शकला.

याबाबत बोलताना प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, ‘प्रेक्षकांनी 'अल्याड पल्याड' वर जसं प्रेम केलं, तसंच भरभरून प्रेम 'घबाडकुंड'ला ही मिळत आहे, हा प्रतिसाद अधिक जबाबदारी वाढवणारा आहे. मराठीमध्ये उत्तम दर्जाचा हॉरर अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न पुढेही सुरू राहील. प्रेक्षकांच्या विश्वासामुळेच आम्ही आणखी मोठ्या कथा आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स विस्तारण्याचं धाडस करू शकतो.’

विदर्भाचा चेहरा म्हणून उदयास आलेले प्रीतम एस. के. पाटील आज बॅक-टू-बॅक सुपरहिट चित्रपटांच्या जोरावर आपले पाय भक्कमपणे रोवत आहेत. मराठी हॉररला नवी दिशा देणाऱ्या या युवा दिग्दर्शकाकडून आता प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande