
मुंबई, 21 जुलै (हिं.स.) ! 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेचा प्रवास ज्या पंढरपूरच्या पवित्र भूमीत सुरू झाला, त्याच पंढरपुरात दोन वर्षांनंतर मालिकेने आपल्या यशस्वी प्रवासाचा खास टप्पा साजरा केला. विठ्ठल-रुक्मिणी भक्तांसाठी आणि मालिकेच्या प्रेक्षकांसाठी झी मराठीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'स्वर पंढरी' या भक्तिमय मैफलीच्या माध्यमातून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मालिकेतील सावली (प्राप्ती रेडकर), सारंग (साईंकित कामत), अबीर (साईराज केंद्रे) आणि ओवी (वेदांती भोसले) हे कलाकार पारंपरिक वेशभूषेत पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांसोबत भक्तिरंगात रंगून गेले.
सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर हिने पंढरपूर वारीचा आपला अनुभव आणि भावना व्यक्त करताना सांगितले “मालिकेत सावलीची भूमिका साकारत असताना मला दोन वेळा वारीला जायचा योग आला आणि त्या आधीही मी एक वर्ष गेले होते. या वर्षी माझं चौथं वर्ष होत. मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते, कारण असं म्हणतात ना, तुमची कितीही उत्कट इच्छा असू दे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत विठुरायाच्या मनात येत नाही, तोपर्यंत तुमच्या दर्शनाचा योग येत नाही. विठूचं बोलावणं असेल, मगच त्याचं दर्शन मिळतं. मला चार वेळा दर्शन मिळालं म्हणजे मी खरंच खूप भाग्यवान आहे. ही विठुरायाची माझ्यावर असलेली असीम कृपा आहे. माझ्या आई-वडिलांचीही इच्छा आहे की त्यांनाही विठ्ठलरायाचं दर्शन घ्यायचं आहे. 'सावळ्याची जणू सावली' मालिकेच्या पहिल्या वर्षाची सुरुवातच आम्ही विठुरायाच्या दर्शनाने केली होती. मागच्या वर्षी आम्ही वारीत चाललो आणि खूप छान दर्शनही घेतलं. त्या वेळी वारीमध्ये आमचं शूटही होतं. मला आधी वाटायचं, मी एवढी कशी चालणार? पण अनुभवाने सांगते, सोबतचे वारकरी खूप गोड आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. स्वतःकडे खायला नसलं तरी दुसऱ्याला आधी खायला देतील. वारीमध्ये शूट सुरू असतानाही पायी चालताना अजिबात थकवा जाणवला नाही. हे बळ विठुरायाच देतो, असं मला वाटतं. एवढं शूट, एवढं चालणं आणि भाविकांची प्रचंड गर्दी असूनही याही वेळेस मला मनसोक्त, डोळे भरून विठ्ठल माऊलींचं दर्शन लाभलं. त्यासाठी मी विठ्ठलाचे मनापासून आभार मानते. इतके आभार की ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
या वर्षी आम्ही शूटसाठी पंढरपुरात जात होतो, पण तिथे शूट होणार की नाही, वारीत सहभागी होणार की नाही, यापैकी काहीच निश्चित नव्हतं. पण माझी एकच इच्छा होती की मला वारीला जायचं आहे. मी सतत विठुरायाला साकडं घालत होते, 'विठुराया, काहीतरी कर, जेणेकरून मला दर्शन मिळेल.' त्याच दरम्यान झी मराठीचा आळंदीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यक्रम होता, पण मुसळधार पावसामुळे तो रद्द झाला. तेव्हा मला वाटलं, यंदा कदाचित दर्शन होणार नाही.
पण अचानक अवघ्या दोन दिवसांत 'स्वर पंढरी' या झी मराठीच्या कार्यक्रमामुळे माझी विठुरायाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. या कार्यक्रमात वारकरी, पंढरपुरातील गावकरी आणि अंध मुल यांचा सहभाग होता. या कार्यक्रमात केतकी माटेगावकरची गाणी, नृत्य सादरीकरणं आणि अनेक कलाकारांचा सहभाग होता. आमच्या मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारेही आले होते. अतिशय भव्यदिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम होता. याच निमित्ताने मला विठुरायाचं दर्शन मिळालं आणि या मोठ्या सोहळ्याचा भाग होण्याचं भाग्यही लाभलं. या सगळ्या अनपेक्षित अनुभवामुळे मी खूप आनंदी आहे. माझ्या अनुभवाने सांगते, आषाढीच्या महिन्यात पंढरपूर खूपच अप्रतिम दिसतं. त्या परिसरात एक अलौकिक शक्ती असल्यासारखं वाटतं.
गेल्या वर्षी वारीत दिंडीत आम्ही शूट करत होतो. माझे आई-बाबा हरवले आहेत असा सीन होता. मी आणि सारंग आई-बाबांना शोधत होतो. मी वारकऱ्यांना विचारत होते, 'माझे आई-बाबा कुणाला दिसले का?' तेव्हा अनेक वारकरी स्वतःची दिंडी सोडून माझ्या आई-बाबांना शोधायला तयार झाले होते. नंतर आम्ही त्यांना हा शूटचा भाग असल्याचं सांगितलं. तेव्हा जाणवलं की वारकरी किती निर्मळ मनाचे असतात.
फॅन मोमेंट सांगायचं झालं तर, शूट सुरू असताना एक काकी माझ्याजवळ आल्या आणि अचानक माझ्या पाया पडल्या. मी त्यांना म्हटलं, 'काकी, माझ्या पाया पडू नका.' पण त्या इतक्या प्रेमाने म्हणाल्या, 'सावली, तुझी भेट झाली आणि तुझ्यातच आम्हाला पंढरी दिसली. आता आम्हाला पंढरीला जायची गरज नाही.' ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते ऐकून माझे डोळे भरून आले. आजही तो क्षण आठवला की खूप भावूक व्हायला होतं.”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर