केज शहरात खत खरेदी करायला आलेल्या एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याला वाळूने भरलेल्या टिप्परने अमानुषपणे चिरडले
बीड, 23 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकाखाली सर्रास सुरू असलेली बेकायदा व बेफाम वाळू वाहतूक पुन्हा एकदा एका निष्पाप बळीराजाच्या जीवावर बेतली आहे. शेतातील पिकाला घालण्यासाठी केज शहरात खत खरेदी करायला आलेल्या एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्य
अपघाती मृत्यू


बीड, 23 जुलै (हिं.स.)।

बीड जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकाखाली सर्रास सुरू असलेली बेकायदा व बेफाम वाळू वाहतूक पुन्हा एकदा एका निष्पाप बळीराजाच्या जीवावर बेतली आहे. शेतातील पिकाला घालण्यासाठी केज शहरात खत खरेदी करायला आलेल्या एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याला वाळूने भरलेल्या टिप्परने अमानुषपणे चिरडले. हा भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात केज शहरातील गजबजलेल्या 'श्री जय भवानी चौकात' गुरुवारी, २३ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत शेतकऱ्याच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

माजलगावहून वाळू घेऊन येणाऱ्या सुसाट टिप्परची धडक

अपघाताची सविस्तर माहिती अशी की, धारूर येथील खडीमशीन चालक सुभाष शरद गायकवाड यांच्या मालकीचे एक टिप्पर (क्रमांक MH 44 U 9971) माजलगाव तालुक्यातील गोदावरी (गंगा) नदीच्या पात्रातून वाळू भरून केज शहराच्या दिशेने येत होते. हे टिप्पर केज येथील श्री जय भवानी चौकातील तीव्र उतारावरून भरधाव वेगाने जात असताना, तांबवा येथील रहिवासी शेतकरी नितीन आदिनाथ चाटे (वय ३५ वर्षे) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक GA 03 AA 8128) खत खरेदीसाठी जात होते. याच वेळी उतारावर सुसाट असलेल्या टिप्परच्या मागील डाव्या चाकाखाली त्यांची दुचाकी अचानक आल्याने हा भीषण अपघात झाला. चाकाखाली चिरडल्या गेल्याने नितीन चाटे यांचा जागीच करुण अंत झाला.

पावसाने उघडीप दिल्याने खत नेण्यास आले होते शेतकरी

केज तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. यामुळे पिकांना खताचा डोस देण्यासाठी नितीन चाटे हे मोठ्या आशेने व अपेक्षेने दुचाकीवरून केज बाजारपेठेत आले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांचे हे स्वप्न आणि संसार अर्धवटच राहिला आहे. त्यांच्या या अकस्मात जाण्याने तांबवा गावावर आणि चाटे कुटुंबावर तीव्र शोककळा पसरली आहे.

अपघात घडताच चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमली. मात्र, संवेदना हरवलेले काही तरुण अपघातात छिन्नविछिन्न झालेल्या पार्थिवाचे मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न असल्याचे दिसून आले. ही संतापजनक बाब लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित असलेले शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक आघाडीचे तालुका प्रमुख माजेद सय्यद आणि बनकरंजा येथील चित्रकार दुर्गादास लांब यांनी तात्काळ पुढे होत अस्ताव्यस्त पडलेल्या पार्थिवाला कापडाने झाकून मानवी संवेदना जपल्या. त्यानंतर सुमित तेलंग यांची रुग्णवाहिका बोलावून पार्थिवाचे उर्वरित अवयव केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी त्यांनी पोलिसांना मोठी मदत केली. त्यांच्या या समयसूचकतेचे व सामाजिक जाणिवांचे सर्वत्र कौतुक होत असून, याप्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande