लातूरमध्ये सामूहिक गुरुचरित्र सारामृत पारायणाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर, 23 जुलै (हिं.स.) : गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये, अशी प्रचलित धारणा असताना गुरुतत्त्व प्रदीप यांच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक श्री गुरुचरित्र सारामृत पारायणमध्ये २०० हून अधिक महिलांनी उत्साहाने सहभाग घेत गुरुचरित्राचे वाचन केले. या
गुरुचरित्र पारायण


लातूर, 23 जुलै (हिं.स.) : गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये, अशी प्रचलित धारणा असताना गुरुतत्त्व प्रदीप यांच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक श्री गुरुचरित्र सारामृत पारायणमध्ये २०० हून अधिक महिलांनी उत्साहाने सहभाग घेत गुरुचरित्राचे वाचन केले. या उपक्रमात महिलांची उपस्थिती पुरुषांपेक्षाही अधिक असल्याचे विशेषत्वाने पाहायला मिळाले.

संस्कृती संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चुकीच्या रूढी-परंपरांना कालसुसंगत स्वरूप देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या हेतूने या सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. पारायणात सहभागी झालेल्या सर्व वाचकांना नित्यपाठ पुस्तिका आणि श्री गुरुचरित्र सारामृत पारायण ग्रंथ मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमात गोपाळ जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दत्तभजन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. तसेच कारगिल युद्धातील सहभागी सेवानिवृत्त सैनिक मिलिंद साकळकर यांनी केलेल्या मृदंगवादनाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, आतापर्यंत १००८ वाचकांच्या सहभागातून सामुदायिक श्री गुरुचरित्र सारामृतची नऊ पारायणे पूर्ण झाली असून दहावे पारायण ऑक्टोबर महिन्यात तुळजापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे विभाग प्रमुख संतोष कुलकर्णी, हैबतपुरे महाराज, आडेप्पा स्वामी तसेच पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांचा संस्कृती संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मधुकर रत्नपारखे, श्रीनिवास पुर्णेकर, मिलिंद साकळकर, शंतनू पांडे, दीपक बेलापूरकर, लक्ष्मण कुलकर्णी, दिलीप जोशी, सुचिता देशपांडे, प्राजक्ता भालेराव, प्रणाली हातोळे, इंदूताई देशपांडे, मेघश्याम कुलकर्णी, राजेश्वरी देशपांडे यांच्यासह दत्तसेवकांनी परिश्रम घेतले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande