आंदोलनकर्त्यांच्या अटकेवर सीजेपीची नाराजी; केंद्र सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
नवी दिल्ली , 27 जुलै (हिं.स.)।कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला आहे की आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारसह काही राज्यांमधून विद्यार्थी आणि इतर आंदोलनकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याच्या, त्यांना ताब्यात घेतल्याच्या तसेच अट
आंदोलनकर्त्यांच्या अटकेवर सीजेपीची नाराजी; केंद्र सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी


नवी दिल्ली , 27 जुलै (हिं.स.)।कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला आहे की आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारसह काही राज्यांमधून विद्यार्थी आणि इतर आंदोलनकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याच्या, त्यांना ताब्यात घेतल्याच्या तसेच अटक केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या वृत्तांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने कोणत्याही आंदोलनकर्त्याविरुद्ध सध्याच्या किंवा भविष्यात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, मग ते भाजपशासित राज्य असो किंवा एनडीएशासित राज्य असो, असे आश्वासन दिल्यानंतरच पक्षाने देशव्यापी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

सीजेपीच्या मते, विविध राज्यांतून येणाऱ्या या बातम्या अत्यंत चिंताजनक आहेत आणि सरकारने आपल्या दिलेल्या आश्वासनाचा मान राखला पाहिजे. पक्षाने सांगितले की, त्यांची कायदेशीर टीम पहिल्या दिवसापासून सक्रिय असून संबंधित राज्यांतील वकिलांच्या सहकार्याने ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या व्यक्तींची सुटका सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पक्षाने केंद्र सरकारला, विशेषतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना, दिलेली आश्वासने पाळली जातील याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. सीजेपीने ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींना तात्काळ मुक्त करण्याची आणि देशात कुठेही कोणत्याही आंदोलनकर्त्याविरुद्ध दबावात्मक किंवा सूडबुद्धीने कारवाई न करण्याची मागणी केली आहे. तसेच आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेण्यात यावेत, अशीही मागणी पक्षाने केली आहे.

निवेदनात सरकारला याचीही आठवण करून देण्यात आली आहे की, या संदर्भात २८ जुलै २०२६ पर्यंत लेखी हमी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. सीजेपीने म्हटले आहे की, देशव्यापी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय पूर्णपणे सद्भावना आणि सरकारच्या आश्वासनांवरील विश्वासाच्या आधारावर घेण्यात आला होता. जर सरकार आपल्या शब्दापासून मागे हटले, तर ते केवळ कॉकरोच जनता पार्टीशी केलेले विश्वासघात ठरणार नाही, तर संवादाचा मार्ग स्वीकारणाऱ्या लाखो युवकांच्या विश्वासालाही तडा जाईल.

पक्षाने स्पष्ट केले की, युवकांशी कोणत्याही प्रकारचा विश्वासघात सहन केला जाणार नाही. सीजेपीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही सरकारची विश्वासार्हता केवळ आश्वासने देण्यात नसून ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यात असते. युवक आंदोलनकर्त्यांना उद्देशून पक्षाने संयम राखण्याचे आवाहन केले असून, सीजेपी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे, असेही सांगितले आहे.

पक्षाने पुन्हा एकदा मागणी केली आहे की, ताब्यात घेतलेल्या आणि अटक करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींना तात्काळ मुक्त करण्यात यावे तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर मागे घेण्यात यावेत. अन्यथा, पुढील आवश्यक पावले उचलण्याचा विचार केला जाईल, असा इशाराही सीजेपीने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande