
परभणी, 28 जुलै (हिं.स.)। राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे या उद्देशाने खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत राज्यांतर्गत पीकस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम २०२६ पासून स्पर्धेसाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या एकूण ११ पिकांचा समावेश असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धा होणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे विजेत्यांची पुढील स्तरासाठी निवड केली जाईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावरील जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्जासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी), प्रवेश शुल्क भरल्याची पावती, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र, आणि बँक पासबुक किंवा धनादेशाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे.
मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी रु. ३०० आणि आदिवासी गटासाठी रु. १५० आहे. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी रु. ५० हजार, द्वितीयसाठी रु. ४० हजार आणि तृतीयसाठी रु. ३० हजार इतके बक्षीस देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी रु. 10 हजार, द्वितीयसाठी रु. 07 हजार आणि तृतीयसाठी रु. 05 हजार इतके बक्षीस देण्यात येणार आहे. आणि तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी रु. 05 हजार, द्वितीयसाठी रु. 03 हजार आणि तृतीयसाठी रु. 02 हजार इतके बक्षीस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील http://Krishi.maharashtra.gov.in 'पीक स्पर्धा नोंदणी' या पर्यायाद्वारे ऑनलाईन अर्ज करून या स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis