राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकनासाठी आरोग्य संस्थांनी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत- हिंगोली जिल्हाधिकारी
हिंगोली, 28 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कार्यपद्ध
अ


हिंगोली, 28 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कार्यपद्धतीत सुधारणा करून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा तसेच राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक मोरे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, संबंधित अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक पायाभूत सुविधा, दुरुस्ती व सुधारणा ही जिल्हा वार्षिक योजना, आरोग्य विभागाच्या विविध योजनांतील उपलब्ध निधी तसेच इतर उपलब्ध निधीच्या माध्यमातून तातडीने पूर्ण कराव्यात. यासाठी आवश्यक मंजुरी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रुग्णालयांतील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला.

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्रक्रियेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि वेळेत अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

या कामात हलगर्जीपणा अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच, जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande