महाराजस्व समाधान शिबीराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, 28 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाज
महाराजस्व समाधान शिबिर


लातूर, 28 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या समाधान शिबिराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समाधान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि पालिका नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. समाधान शिबीराच्या माध्यमातून महसूलविषयक तक्रारी स्वीकारणे, विविध प्रमाणपत्रे व आभा कार्ड वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देणे, ई-केवायसी करणे, नवीन व दुय्यम डिजिटल शिधापत्रिका तसेच डिजिटल सातबारा व फार्मर आयडी देणे, मोजणी अर्ज स्वीकारणे व क-प्रत वाटप करणे, आधार नोंदणी व अद्ययावतीकरण आणि पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड यांसारख्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

अध्यक्षीय भाषणात बोलताना उषाताई पाटील यांनी नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निवारण करण्यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत शासकीय योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जात असल्याचे सांगितले.

महसूल विभागामार्फत जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. भटके विमुक्त व दिव्यांगांसाठीच्या योजनांवर प्रशासन भर देत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी, तसेच सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर या उपक्रमातून ग्रामीण भागातील ३५० पेक्षा अधिक वाद सोडवले असून शहरी भागात पोलीस तुमच्या सोसायटीमध्ये व विद्यार्थी संवादातून सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली. पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई भिसे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, महानगरपालिका विरोधी पक्षनेते देविदास काळे, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी या समाधान शिबीरासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले असून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी प्रास्ताविक करताना कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅक नोंदणीसाठी १० स्टॉल्स लावण्यात आल्याचे नमूद केले. यावेळी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देणारी नाटिकाही सादर करण्यात आली. या प्रसंगी आरोग्य शिबिरासह विविध योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी ३४ स्टॉल लावण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande