मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात तफावत
जायकवाडी ६१ टक्क्यांवर, येलदरी ५२ टक्के तर सिद्धेश्वरचा जिवंत साठा शून्यावर परभणी, २८ जुलै (हिं.स.) : मराठवाड्यातील प्रमुख धरणांमध्ये पावसामुळे पाण्याची आवक सुरू झाली असली तरी धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तफावत दिसून येत आहे. पैठण येथील जायकवाडी धरण
मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात तफावत


जायकवाडी ६१ टक्क्यांवर, येलदरी ५२ टक्के तर सिद्धेश्वरचा जिवंत साठा शून्यावर

परभणी, २८ जुलै (हिं.स.) : मराठवाड्यातील प्रमुख धरणांमध्ये पावसामुळे पाण्याची आवक सुरू झाली असली तरी धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तफावत दिसून येत आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६१.०९ टक्क्यांवर पोहोचला असून, येलदरी धरणातील जिवंत पाणीसाठा ५२.७४ टक्के झाला आहे. मात्र, सिद्धेश्वर धरणातील जिवंत पाणीसाठा अद्यापही शून्यावरच कायम आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणात मंगळवारी (दि. २८) सकाळी ६ वाजेपर्यंत ६१.०९ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला. धरणाची पाणीपातळी १,५१४.०९ फूट झाली असून धरणात ४९ हजार ७४८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असून आवक कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

येलदरी धरणातील जिवंत पाणीसाठा ५२.७४ टक्के असून धरणात ४२७.०४५ दलघमी जिवंत तर १२४.६७० दलघमी मृत पाणीसाठा आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ५५१.७१५ दलघमी इतका नोंदविण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी ४५७.५२० मीटर असून ती इशारा पातळी ४६१.७७२ मीटर आणि धोका पातळी ४६२.३८० मीटर पेक्षा कमी आहे.

गेल्या २४ तासांत येलदरी धरणात ०.२७५ दलघमी (२७.०५३ दशलक्ष घनमीटर) पाण्याची आवक झाली आहे. धरण परिसरात ४ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या वर्षातील एकूण पर्जन्यमान २८६ मिमी झाले आहे.

दुसरीकडे, सिद्धेश्वर धरणात अद्यापही जिवंत पाणीसाठा शून्य आहे. धरणातील एकूण पाणीसाठा १६१.९६० दलघमी असून तो पूर्णपणे मृत पाणीसाठा आहे. धरणाची पाणीपातळी ४०९.९४० मीटर असून ती इशारा पातळी ४१३.००५ मीटर आणि धोका पातळी ४१४.८३० मीटर पेक्षा कमी आहे.

गेल्या २४ तासांत सिद्धेश्वर धरणात १.३७६ दलघमी (५०.७१९ दशलक्ष घनमीटर) पाण्याची आवक झाली आहे. धरण परिसरात ५ मिमी पाऊस झाला असून चालू वर्षातील एकूण पर्जन्यमान ३२४ मिमी नोंदविण्यात आले आहे. मागील वर्षी याच दिवशी ३६४ मिमी पावसाची नोंद झाली होती.

सध्या सिद्धेश्वर धरणाच्या विनाद्वार सांडवा तसेच मुख्य दरवाजांमधून कोणताही विसर्ग सुरू नसून सर्व दरवाजे बंद आहेत.

जलसंपदा विभागाकडून जायकवाडी, येलदरी आणि सिद्धेश्वर या तिन्ही धरणांतील पाणीपातळी, पाण्याची आवक आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या स्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande