
नांदेड, 28 जुलै, (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकतर्फी निवडणुकीमध्ये खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने २३ पैकी २१ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये वरील पॅनेलचे १० उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित दोन जागांवर दोन स्वतंत्र उमेदवारांचा विजय झाला. या बँकेच्या इतिहासात संचालक मंडळामध्ये प्रथमच पाच महिलांनी प्रवेश केला आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मागील एक महिन्यांपासून या निवडणुकीने व्यापून टाकले होते. २३ जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ११ जणं बिनविरोध निवडून आले. त्यांत तीन आमदारांसह काही दिग्गज नेत्यांच्या घरातील प्रतिनिधींनी संचालक मंडळातील आपली जागा निश्चित करून घेतली होती.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी असलेल्या ‘अ’ मतदारसंघातील १६ जागांपैकी ९ जागांवर झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीत वरील पॅनेलचे ७ उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित दोन जागांवर कृष्णा नागेश पाटील आष्टीकर (हदगाव) आणि संगीता पाटील (नांदेड) या दोन स्वतंत्र उमेदवारांचा विजय झाला. जिल्हास्तरीय पाच जागांपैकी महिलांच्या दोन जागांची निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित तीन जागांवर अनिल पाटील बाभळीकर (ओबीसी), रामचंद्र विठ्ठलराव मुसळे (अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी), ज्ञानेश्वर दहिफळे (भ.वि.जाती/जमाती/वि.मा.प्र.) हे शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. त्याआधी बिगरशेती व नागरी बँका-पतसंस्था या दोन मतदारसंघात याच पॅनेलचे दोन उमेदवार बिनविरोध आले होते.
जिल्हा बँकेत महिला प्रतिनिधींसाठी दोन जागा राखीव असून त्यावर सुशीलाबाई बेटमोगरेकर व पूनम पवार यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. सेवा सहकारी संस्था मतदारसंघांमधून डॉ.मीनल पाटील खतगावकर (बिलोली) व प्रणिता देवरे-चिखलीकर (कंधार) याही बिनविरोध आल्या होत्या. त्यानंतर आता संगीता पाटील (नांदेड) निवडून आल्या आहेत. मागील काळात बँकेच्या संचालक मंडळात कधी दोन तर कधी तीन महिलांनी प्रतिनिधित्व केले. आता नारीशक्तीचे बळ पाचपर्यंत वाढले आहे.
बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वात चुरशीची निवडणूक हिमायतनगर, देगलूर व माहूर या तीन तालुक्यांत झाली. पण या तीनही जागांवर शेतकरी विकास पॅनेलचे सर्वश्री माधवराव जवळगावकर, विजयसिंह देशमुख, राजेंद्र केशवे हे तिघे विजयी झाले. बँकेवर सहा माजी संचालक पुन्हा निवडून आले असून १७ जण प्रथमच बँकेत दाखल होत आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचे खा.अशोक चव्हाण, खा.रवींद्र चव्हाण, आ.प्रताप पाटील चिखलीकर, ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी अभिनंदन केले आहे.
नवनिर्वाचित संचालकांची नावे अशी!
बालाजी रामजी तथा बी.आर.कदम, मारोतराव कवळे, प्रताप पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे-चिखलीकर, भीमराव रामजी केराम, विजयसिंह देशमुख, दत्तात्रय रेड्डी, संगीता विठ्ठल पाटील, श्रीनिवासराव चव्हाण, मीनल निरंजन पाटील, राजू गंगाधर जाधव, राजेंद्र केशवे, डॉ.तुषार राठोड, मारोती जाधव, कृष्णा नागेश पाटील, माधवराव पवार जवळगावकर, शिवराम लुटे, कैलास देशमुख गोरठेकर, ज्ञानेश्वर दहिफळे, पूनम पवार, सुशीलाबाई पाटील बेटमोगरेकर, अनिल पाटील बाभळीकर व रामचंद्र मुसळे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis