
नाशिक, 28 जुलै (हिं.स.)। नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शाहूनगर, भैरूबाबा नगर परिसरातील नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास नदीकाठालगत असलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके, वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्य पाण्यात भिजून निकामी झाल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या.
या घटनेची माहिती परिसरातील स्थानिक महिला स्नेहा बनसोडे यांनी आमदार सीमा हिरे यांना दूरध्वनीद्वारे दिली. माहिती मिळताच आमदार सीमा हिरे यांनी तात्काळ दखल घेत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सीमा हिरे यांच्या वतीने शाहूनगर व भैरूबाबा नगर येथील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा धागा पुन्हा जोडण्यास हातभार लागला.
यावेळी विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांनी आमदार सीमा हिरे यांनी संकटाच्या काळात दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी डॉ. वैभव महाले, शर्वरी कुलकर्णी, श्रीधर कुलकर्णी, मोहिनी पवार, अशोक पवार, अविनाश नेरे, सुनील बेलदार, रामचंद्र जगताप, युवराज सैंदाणे, सुरेश गांगुर्डे, केतन अवसरकर, डॉ. राजेश सिंग, अतुल पवार, प्रतीक जागडे, गौतम खैरनार, गोकुळ शिरोडे, अमित कुलथे, भूषण माळवे, राहुल अहिरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV