नाशिक - मनपा प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाकडून निषेध
नाशिक, 28 जुलै, (हिं.स.)। नाशिक महानगरपालिकेत सत्ता असतानाही प्रशासनाच्या कथित उदासीन कारभाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) चे नाशिकरोड प्रभागातील सत्ताधारी नगरसेवक कैलास मुदलियार यांनी जाहीर निषेध नोंदवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. न
नाशिक - मनपा प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाकडून निषेध


नाशिक, 28 जुलै, (हिं.स.)। नाशिक महानगरपालिकेत सत्ता असतानाही प्रशासनाच्या कथित उदासीन कारभाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) चे नाशिकरोड प्रभागातील सत्ताधारी नगरसेवक कैलास मुदलियार यांनी जाहीर निषेध नोंदवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक रोड प्रभागामध्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या निषेधार्थ दत्तमंदिर चौकात फलक लावून त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला अशा प्रकारे सार्वजनिक निषेध नोंदवावा लागल्याने आता तरी प्रशासन याची दखल घेणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दत्तमंदिर ते सिन्नर फाटा दरम्यान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंनी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दररोज लहान-मोठे अपघात घडत असून नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. यापूर्वीही या उड्डाणपुलावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरसेवक कैलास मुदलियार यांनी या धोकादायक खड्ड्यांबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने अपेक्षित कार्यवाही न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर दत्तमंदिर चौकातील उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल ठरतोय मृत्यूचा सापळा... वारंवार विनंती करूनही नाशिक महानगरपालिका लक्ष देत नाही असा फलक लावून त्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.

विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानेच अशा प्रकारे निषेधाचा मार्ग स्वीकारल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्तेतील लोकप्रतिनिधीलाच नागरिकांच्या सुरक्षेसाठी फलक लावून आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागत असेल, तर ही बाब प्रशासनासाठी निश्चितच आत्मपरीक्षणाची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आता तरी मनपा प्रशासन जागे होऊन उड्डाणपुलावरील खड्डे तातडीने बुजवून वाहनचालकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande