
सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। सोलापूरातील पद्मशाली समाजाची विद्यार्थिनी अनुष्का श्रीकांत आरकाल हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘वर्ल्ड परफॉर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिप – सीझन ८’ या स्पर्धेत भरतनाट्यम् (सोलो ज्युनियर) गटात तृतीय क्रमांक मिळवत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अखिल नटराजम् आंतर सांस्कृतिक संघ, नागपूर यांच्या आयोजनात तसेच इंटरनॅशनल डान्स कौन्सिल, पॅरिस (फ्रान्स) यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली होती. अनुष्काने ‘निली मेघामलू लो’ या गीतावर सादर केलेल्या भरतनाट्यम् नृत्याने परीक्षकांची मने जिंकत तिसरे स्थान मिळवले. या स्पर्धेत भारतासह अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर आदी देशांतील सुमारे ४५ ते ५० स्पर्धक सहभागी झाले होते. भरतनाट्यम्, कुचीपुडी, कथ्थक, ओडिसी, मोहिनीयाट्टम, सेमी क्लासिकल, फोक, बॉलिवूड, हिप-हॉप आणि मॉडर्न अशा विविध नृत्यप्रकारांचा समावेश होता. स्पर्धेसाठी सादर केलेल्या व्हिडिओला परीक्षकांच्या गुणांसोबतच सोशल मीडियावरील प्रतिसादालाही महत्त्व देण्यात आले.
अनुष्काच्या व्हिडिओला १,२३४ लाईक्स, ४,५५० हून अधिक शेअर्स आणि ५,४९१ पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. यापूर्वीही आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील भरतनाट्यम् स्पर्धेत अनुष्काने भारतातून तृतीय क्रमांक पटकावला होता. अनुष्का सध्या सोलापूरातील पद्मशाली शिक्षण संस्थेच्या डी.आर. श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून, तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड