
नवी दिल्ली, 06 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या 26 हिंदूंच्या नरसंहार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
एनआयएच्या माहितीनुसार, हाफिज सईद याच्यावर वैयक्तिकरित्या तसेच बंदी घालण्यात आलेल्या लश्कर-ए-तैयबा आणि त्याची प्रॉक्सी संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट'चा (टीआरएफ) प्रमुख म्हणूनही आरोप ठेवण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 तसेच बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) 1967 अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपांमध्ये भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, सीमापार कट रचणे आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे नियोजन व अंमलबजावणी केल्याचा समावेश आहे. हे पुरवणी आरोपपत्र यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या 1597 पानी मुख्य आरोपपत्राचा भाग असून, त्यात पाकिस्तानमधून रचण्यात आलेल्या कटाचा तपशील, हाफिज सईदची कथित भूमिका तसेच एनआयएच्या वैज्ञानिक तपास आणि क्षेत्रीय चौकशीतून मिळालेल्या पुराव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
एनआयएने स्पष्ट केले की, या पुरवणी आरोपपत्रामुळे यापूर्वीच्या तपासाला अधिक बळ मिळाले आहे. यापूर्वी एजन्सीने पाकिस्तानस्थित हँडलर साजिद जट्ट याच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल केले होते. तसेच जुलै 2025 मध्ये 'ऑपरेशन महादेव'दरम्यान सुरक्षा दलांनी ठार केलेल्या 3 दहशतवाद्यांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींवरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी एनआयएने लश्कर-ए-तैयबा आणि त्याची प्रॉक्सी संघटना टीआरएफ यांना या कटातील प्रमुख संघटना म्हणून आरोपपत्रात नमूद केले होते. पहलगाम हल्ल्याचे षड्यंत्र रचणे, त्यासाठी मदत करणे आणि हल्ला घडवून आणणे, असे गंभीर आरोप या संघटनांवर ठेवण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 हिंदूंचा मृत्यू झाला होता.------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी